अहिल्यानगर लाचलुचपतची कारवाई । पाथर्डी-शेवगाव तालुक्यात खळबळ
पाथर्डी । वीरभूमी- 05-Apr, 2025, 11:51 AM
शेवगाव तहसीलारांनी अवैध मुरुम वाहतूक करतांना पकडलेले डंपर दंड भरल्यानंतर ते सोडण्यासाठी पाथर्डी प्रांताधिकारी कार्यालयाचा आदेश मिळवण्यासाठी खाजगी इसमाने कार्यालयातील कारकुनासाठी तक्रारदाराकडे सात हजारांची लाच मागितली होती. यापैकी तीन हजाराची लाच घेतांना अहिल्यानगर लाचलुचपत पथकाने खाजगी इसमाला रंगेहात पकडले. लाच घेणार्या खाजगी इसमाचे नाव अभिषेक दत्तात्रय जगताप (वय 35, रा. शास्त्रीनगर, शेवगाव) असी असून या घटनेने पाथर्डीसह शेवगाव तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.
याबाबत समजलेली माहिती अशी की, दि. 30 जुलै 2023 रोजी शेवगाव तहसीलदारांनी अवैध मुरम वाहतूक केल्याप्रकरणी तक्रारदार यांचा डंपर ताब्यात घेतला होता. या डंपरवर तहसीलदारांनी 2 लाख 36 हजार 300 रुपये दंडात्मक कारवाई केली होती. तक्रारदार यांनी डंपरवरील दंड न भरल्याने शेवगाव तहसीलदारांनी तो डंपर लिलावात काढल्याने दि. 25 मार्च 2025 रोजी तक्रारदार यांनी चलनाद्वारे त्यांचे डंपर वरील दंडाची रक्कम 2 लाख 36 हजार 300 रुपये भरलेले आहेत.
त्यानंतर शेवगाव तहसीलदारांनी तक्रारदार यांचे डंपर वाहन सोडण्याकरीता आदेश होणेबाबतचे पत्र पाथर्डी प्रांताधिकारी यांना दिले होते. तक्रारदार यांचे डंपर वाहन सोडण्याचा अंतिम आदेश मिळणेवर त्यांचे प्रकरण उपविभागीय अधिकारी पाथर्डी भाग यांचे कार्यालयात प्रलंबित आहे.
खाजगी इसम अभिषेक दत्तात्रय जगताप याने तक्रारदार यांचे डंपर वाहन सोडण्याचे आदेश देण्याकरिता उपविभागीय अधिकारी कार्यालय, पाथर्डी येथील कारकून मोडसे मॅडम यांचेसाठी 7500 रुपये लाचेची मागणी केले बाबतची तक्रार दि.3/4/2025 रोजी अहिल्यानगर लाचलुचपत विभागाकडे केली होती. लाच मागणी तक्रारीच्या अनुषंगाने दि.4/4/2025 रोजी लाच मागणी पडताळणी करण्यात आली.
लाच मागणी पडताळणी दरम्यान आरोपी (खाजगी इसम) अभिषेक दत्तात्रय जगताप याने पंचासमक्ष तक्रारदार यांचेकडे डंपर वाहन सोडण्याचे आदेश देण्याकरिता पाथर्डी प्रांताधिकारी कार्यालयातील कारकून मोडसे मॅडम यांचे करिता 7,000 रुपये लाचेची मागणी केली व त्यापैकी तीन हजार रुपये आज स्वीकारण्याचे मान्य केले.
दि.4/4/2025 रोजी शेवगाव तहसील कार्यालयात अहिल्यानगर लाचलुचपत विभागाच्या कारवाईत आरोपी अभिषेक जगताप यांनी तक्रारदार यांचे कडून तीन हजार रुपयाची लाच स्वीकारली असता त्याला रंगेहात पकडण्यात आले. याप्रकरणी आरोपीविरुद्ध पाथर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई नाशिक परिक्षेत्र लाच प्रतिबंधक विभागाचे पोलिस अधीक्षक श्रीमती वालावलकर व अहिल्यानगर लाच लुचपत विभागाचे पोलिस उपअधीक्षक अजित त्रिपुटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोनि. राजू आल्हाट, महिला पोलीस हवालदार राधा खेमनर, पो. ना. चंद्रकांत काळे, चापोहेकॉ. दशरथ लाड यांच्या पथकाने केली.
Comments