यंदा स्कुल चले हम १५ जुनला नाहीच.... अनेक वर्षांची परंपरा खंडित
डॉ. अफरोजखान पठाण | वीरभूमी- 15-Jun, 2020, 12:00 AM
१५ जून म्हंटल की शैक्षणिक कामकाजाचा अत्यंत महत्वाचा दिवस. शैक्षणिकदृष्टया या दिवशी शालेय कामकाज उन्हाळ्याच्या दिर्घ सुट्टीनंतर सुरू होत असते. मात्र यंदा कोरोना महामारी या दिवसाला सुद्धा ग्रहण लागले. कोरोना पार्श्वभूमीवर राज्य सरकार, जिल्हा प्रशासन यांच्या आदेशानुसार खबरदारीचा उपाय म्हणून शैक्षणिक संस्थानी शालेय कामकाज सुरू ठेवले नाही. या कारणांमुळे विद्यार्थ्यांचा सुद्धा चांगलाच हिरमोड झाला आहे.
उन्हाळ्याच्या दिर्घ सुट्टीनंतर चालू शैक्षणिक धोरणानुसार १५ जुन या तारखेला विशेष महत्व प्राप्त झाले आहे. १५ जुनला प्रत्येक शाळा आणि महाविद्यालयात प्रत्यक्ष शालेय कामकाजाचे काम सुरू होत असते. या दिवसासाठी सर्वच शैक्षणिक संस्था आपल्या नुतन वर्गातील विद्यार्थी वर्गाच्या प्रवेशासाठी आणि स्वागतासाठी विविध फंडे अमलांत आणत असतात. ढोल-ताशा पथक पासून ते गुलाबपुष्प वृष्टी करणे, नुतन वर्गाला कार्टून्स आणि विविध रंगीबेरंगी पताका लावत वर्ग सजविणे अशा विविध कल्पना राबवित विद्यार्थ्याचे वेलकम करीत असतात.मात्र यंदाच्या सन २०२०-२१ शैक्षणिक वर्षात १५ जुनला ही परंपरा खंडित झाली आहे.
कोरोना महामारीमुळे यंदाच्या शैक्षणिक वर्षास आणि प्रत्यक्ष अध्यापन कामकाजास कधी सुरुवात होईल हे सांगणे कठीण बनले आहे. विद्यार्थी या दिवसाची मोठ्या आनंदाने वाट पाहत असतात की, नवीन वर्ग, नवीन शिक्षक यासह नवी कोरे शालेय पुस्तक, वह्या आणि दफ्तर याचे अप्रूप असते. मात्र यंदा त्यांचा चांगलाच हिरमोड झाला आहे. आजच्या दिवशी सडा रांगोळी रेखाटत शालेय परिसर देखणा करणारे चित्र बदलले गेले असून त्याजागी ओसाड आणि निर्जन शाळा परिसर पहावयास मिळत होता.
Comments