पालकमंत्री हसन मुश्रीफ । नुकसानग्रस्त शेतकर्यांना दिला दिलासा
बोधेगाव । वीरभूमी - 22-Oct, 2020, 12:00 AM
राज्य सरकार शेतकर्यांच्या पाठीशी असून येत्या आठ दिवसात अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीचे पंचनामे पूर्ण करून दिवाळी पर्यंत शेतकर्यांना आर्थिक मदत देण्याचा प्रयत्न सरकार करत आहे. वेळप्रसंगी कर्ज काढून शेतकर्यांना मदत देण्यासाठी सरकार कटीबद्ध असल्याचे सांगत पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी नुकसानग्रस्त शेतकर्यांना दिलासा दिला.
शेवगाव तालुक्यातील बोधेगावसह परिसरातील शिंगोरी, आंतरवाली, शोभानगर, लाडजळगाव येथील नुकसानीची पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी पाहणी केली. या पाहणी दरम्यान पत्रकारांशी ते बोलत होते.
पालकमंत्री मुश्रीफ म्हणाले, अतिवृष्टीने जिल्ह्यात नुकसान झाले असून शेवगाव व पाथर्डी तालुक्यातील नुकसान जास्त आहे. आता 70 ते 80 टक्के पंचनामे झाले असून येत्या आठ दिवसात पंचनामे पूर्ण करून शेतकर्यांना दिवाळीच्या अगोदर जास्तीत जास्त मदत देण्यासाठी राज्य सरकार प्रयत्नशिल आहे. केंद्र सरकारने राज्य सरकारच्या हक्काचे जीएसटीचे 30 हजार कोटी दिले नाही. मात्र शेतकर्यांना मदत करण्याची भूमिका मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व सरकारची आहे. यामुळे शेतकर्यांच्या मदतीसाठी वेळप्रसंगी कर्ज काढून जास्तीत जास्त शेतकर्यांना मदत देण्याचा प्रयत्न करू, असे आश्वासन पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी दिले.
यावेळी माजी आ. चंद्रशेखर घुले, जि. प. अध्यक्षा राजश्रीताई घुले, पंचायत समिती सभापती डॉ. क्षितीज घुले, केदारेश्वरचे अध्यक्ष अॅड. प्रताप ढाकणे, प्रांताधिकारी देवदत्त केकाण, तहसीलदार अर्चना पागिरे, गटविकास अधिकारी महेश डोके, तालुका कृषी अधिकारी किरण मोरे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष कल्याण नेमाने, माजी सभापती दिलीप लांडे, जि. प. सदस्य संगिता दुसंगे आदीसह कार्यकर्ते व शेतकरी उपस्थित होते.
FDvMIAKEeXNzPkw