राज्यमंत्री ना.प्राजक्तदादा तनपुरे यांचे वनविभागाला आदेश । बुधवंत कुटुंबाची शिरापूर येथे जावून घेतली सांत्वनपर भेट
करंजी । वीरभूमी- 30-Oct, 2020, 12:00 AM
तिसगाव परिसरातील सुमारे 12 गावांमध्ये बिबट्याने धुमाकूळ घातला आहे. जो पर्यंत बिबट्याचा सोक्षमोक्ष लागत नाही तोपर्यंत वनविभागाचा एकही कर्मचारी नेमणुकीची जागा सोडणार नाही. माणसाचा जीव महत्वाचा असून बिबट्याला जीवंत अथवा मृत पकडून नागरिकांना दिलासा द्या. कोणत्याही प्रकारची कर्तव्यात कसूर खपवून घेतली जाणार नसल्याचा इशारा राज्यमंत्री ना. प्राजक्तदादा तनपुरे यांनी देत बिबट्या पकडण्याचे आदेश वनविभागाला दिले.
गुरुवारी सायंकाळी शिरापूर येथील संजय मुरलीधर बुधवंत यांच्या 4.5 वर्षाच्या मुलाला आईसमोरून बिबट्याने उचलून नेले. घटना घडल्यानंतर वनविभागासह उपस्थित नागरिकांनी बिबट्याचा पाठलाग करत चिमुकल्याला बिबट्याच्या तावडीतून सोडवण्याचा प्रयत्न केला. मात्र सर्व प्रयत्न अपयशी ठरले. अखेर त्या नरभक्षक बिबट्याने चिमुकल्याचा जीव घेतला. शोधाशोध केल्यानंतर कंबरेखालील भाग खाल्लेल्या अवस्थेत चिमुकल्याचा मृतदेह आढळला.
या घटनेची माहिती कळताच शुक्रवारी सकाळी राज्यमंत्री ना. प्राजक्तदादा तनपुरे यांनी शिरापूर येथे जावून बुधवंत कुटुंबाची भेट घेवून सांत्वन केले. यावेळी उपस्थित ग्रामस्थांनी वनविभागाच्या हलगर्जी पणाबद्दल पाढा वाचत वनविभागाच्या अधिकार्यांवर कारवाई करण्याची मागणी ना. तनपुरे यांच्याकडे केली.
यावेळी ना. तनपुरे म्हणाले की, या परिसरात बिबट्याने धुमाकूळ घातला असून नागरिक भीतीयुक्त वातावरणात जीवन जगत आहे. वनविभागाने तातडीने नरभक्षक बिबट्याला पकडण्यासाठी योग्य ती कारवाई करावी. यामध्ये वनविभागाचे अधिकारी, कर्मचारी हलगर्जीपणा करतील त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल. या नरभक्षक बिबट्याचा सोक्षमोक्ष लागेपर्यंत एकही कर्मचारी नगमणुकीचे ठिकाण सोडणार नाही. आता चौथा बळी आम्हाला घालवायचा नसून माणसाचा जीव महत्वाचा आहे. नरभक्षक बिबट्याला जीवंत अथवा मृत पकडावे, असे आदेश ना. तनपुरे यांनी वनविभागाला दिले.
Comments