बिबट्या पकडण्यात वनविभागाला अपयश । भाजपा कार्यकर्त्यांकडून तीव्र शब्दात निषेध
करंजी । वीरभूमी - 30-Oct, 2020, 12:00 AM
गेल्या आठ दिवसापासून वनविभागाच्या हद्दीत व परिसरामध्ये जवळपास पंधरा गावांमध्ये नरभक्षक बिबट्याने धुमाकूळ घातला आहे. अनेक जनावरे फस्त केले असून दोन निष्पाप मुलांना जीव गमवावा लागला आहे. मात्र वनविभाग ठोस अशी कोणतीच कार्यवाही करत नाही. त्यामुळे या बिबट्याचे माणसांवर होणारे हल्ले वाढले आहेत.
नरभक्षक बिबट्याला जेरबंद करण्यात वनविभागाला अपयश आले असून त्यामुळे वनविभागाच्या विरोधात तिसगाव येथील वृध्देश्वर हायस्कुल चौकात शुक्रवारी सकाळी 10 वाजता रास्तारोको आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा परिषद सदस्य सौ. संध्याताई पुरुषोत्तम आठरे यांनी दिली आहे.
पाथर्डी तालुक्यातील मढी, घाटशिरस, मायंबा, केळवंडी, धामणगाव, माणिकदौंडी आदी परिसरामध्ये नरभक्षक बिबट्याने धुमाकूळ घातला आहे. अनेक ग्रामस्थ रात्री व दिवसाही दहशतीच्या वातावरणामध्ये जगत आहेत. तर अनेक शेतकरी दिवसाही शेतामध्ये जाण्यासाठी घाबरत आहेत. त्यातच काल गुरुवारी संध्याकाळी साडेसात वाजता बुधवंत कुटुंबातील एका चिमुरड्याला बिबट्याने पळवून नेल्याची घटना घडल्याने ग्रामस्थांमध्ये संतापाचे वातावरण पसरले आहे.
बिबट्याचे हल्ले वाढत आहेत. मात्र तरीही वनविभागाचे अधिकारी-कर्मचारी पिंजरा लावण्यात दंग आहेत. त्यांना कुठलाही बिबट्याचा सुगावा लागत नाही. गेल्या आठवड्यामध्ये दोन निष्पाप जीवांचे बळी घेतले आहेत. आणखी किती बळी घेणार? असा प्रश्न उपस्थित करून सौ. आठरे म्हणाल्या की, या निष्क्रिय वन विभागाच्या अधिकार्यांच्या व कर्मचार्यांच्या विरोधात ठोस भुमीका घेण्याची वेळ आता आली आहे. त्यामुळे त्यांच्या विरोधात रास्तारोको आंदोलन करण्यात येणार आहे.
आंदोलन जि. प. सदस्या सौ. संध्या आठरे, उपसभापती सौ. मनिषा रविंद्र वायकर तसेच इतर पदाधिकारी यांचे नेतृत्वाखाली होणार आहे.
Comments