चार दिवसानंतरही बिबट्याचा शोध सुरूच । वनविभागाच्या पथकांची धावाधाव सुरूच
पाथर्डी । वीरभूमी - 01-Nov, 2020, 12:00 AM
आज रविवारीही वनविभागाच्या अधिकारी, कर्मचारी व विशेष पथकाने नरभक्षक बिबट्याचा शोध घेतला, मात्र बिबट्याचा कोणताही ठावठिकाणा लागला नाही. सकाळी शिरसाटवाडी तलावाजवळ बिबट्याची शिकार झालेल्या कुत्र्याचा मृतदेह आढळला.
मात्र बिबट्याचा कोणताही मागमूस न लागल्या नागरिकांत भितीचे वातावरण आहे. तर सोशल मीडियावर बिबट्या दिसला अशा अनेक अफवांच्या पोस्ट व्हायरल होत असल्याने अफवांची दहशत निर्माण झाली आहे.
मढी, केळवंडी व शिरापूर येथील बालकांचा जीव घेणार्या नरभक्षक बिबट्याला शोधण्यासाठी वनविभागाने कंबर कसली आहे. गर्भगिरीचा डोंगर परिसर वनविभागाच्या कर्मचार्यांनी पिंजून काढला मात्र चार दिवसानंतरही नरभक्षक बिबट्या पकथकांना चकवा देण्यात यशस्वी झाला आहे.
बिबट्याचा शोध सुरू असून नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन वनविभागाच्यावतीने करण्यात येत आहे. रविवारी सकाळी शिरसाटवाडी तलावाजवळ एका कुत्र्याची बिबट्याने शिकार केल्याचे आढळून आले. मात्र बिबट्या त्यानंतर कोणत्या भागात गेला, कुठे लपून बसला याबाबत कोणताही तपास होवू शकला नाही.
मात्र बिबट्याच्या दहशतीमध्ये सोशल मीडियावरील व्हायरल पोस्टच्या दहशतीची भर पडत आहे. अनेक जुने व्हिडीओ, फोटो आपल्याच भागातील असल्याचे दाखला देत ते सोशल मीडियावर टाकली जात असल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. डोंगरावर चढणारा फोटो हा मायंबा, करंजी, तारकेश्वर गड आदी भागातील असल्याच्या वेगवेग़ळ्या पोस्ट व्हायरल करून अफवा पसरवली जात आहे. तसेच मागील जुने व्हिडीओ पुन्हा पुन्हा टाकून बिबट्या आत्ताच पाहिला असल्याचे सांगत अफवा पसरवल्या जात आहेत. यामुळे आता बिबट्याच्या दहशतीबरोबर अफवांचीही दहशत निर्माण झाल्याने नागरिकांत भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.
Aliza Stephenson