कर्जत पोलिसांची कारवाई । इतरांचीही फसवणूक झाली असल्याचा संशय
कर्जत । वीरभूमी - 01-Nov, 2020, 12:00 AM
स्वतःच्या घरात आणि वाहनात घातक शस्र आणि अंबर दिवा बाळगत असलेला आरोपी उपविभागीय पोलीस अधिकारी आण्णासाहेब जाधव आणि त्यांच्या पथकाने जेरबंद केला. यावेळी आरोपी बाळगत असलेले वाहन कर्जत पोलिसांनी ताब्यात घेतले असून पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल प्रबोध हंचे करीत आहेत.
याबाबत पोलीस सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार, शनिवार, दि. 31 रोजी उपविभागीय पोलीस अधिकारी आण्णासाहेब जाधव रात्रगस्त करीत असताना गुप्त बातमीदारामार्फत टाकळी खंडेश्वरी (ता. कर्जत) येथे दत्तू मुरलीधर सकट (रा. सपकाळ वस्ती) याने विनापरवाना बेकायदेशीर दोन घातक तलवारी आपल्या स्वतःच्या घरात आणि वाहनात लपवून ठेवल्या आहेत अशी माहिती दिली. सदर घटनेचे गांभीर्य लक्षात घेता उपविभागीय पोलीस अधिकारी जाधव यांनी कर्जत पोलिसांचे पथक तयार करीत टाकळी खंडेश्वरी येथील सपकाळ वस्ती आरोपी सकट याच्या घराची व घरासमोर लावलेल्या फिक्कट पांढर्या रंगाच्या टाटा सफारी गाडीची (एमएच 16, आर 4833) झडती घेतली असता त्यामध्ये लोखंडी धातूची पितळाची मूठ असलेली तलवार आणि नारंगी रंगाचा अंबर दिवा तसेच घरात लोखंडी धातूची मूठ असलेली सिल्व्हर कलर असलेली तलवार मिळून आली.
सदर आरोपीला मिळालेल्या मुद्देमालासह ताब्यात घेण्यात आले असून पोलीस कॉन्स्टेबल आदित्य बेलेकर यांच्या फिर्यादीवरून कर्जत पोलिसांनी गुरन 1032/2020 आर्म अॅक्ट 4/25 व सीएमव्हीआर 108/177 एमव्ही अॅक्ट प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यास अटक करण्यात आले आहे. आरोपी दत्तू सकट याने अंबर दिवा आणि घातक शस्राचा वापर करून आणखी काही गुन्हे केले आहे का? व कसे याची अधिक माहिती आणि तपास पोहेकॉ. प्रबोध हंचे करीत आहे.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक मनोजकुमार पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक आण्णासाहेब जाधव यांच्यासह पोलीस अंमलदार गौतम फुंदे, पोना केशव व्हरकटे, ह्रदय घोडके, सागर जंगम, आदित्य बेलेकर, गोवर्धन कदम, वैभव सुपेकर, दादाराम म्हस्के, रत्नमाला हराळे, पोकॉ. मच्छिंद्र जाधव, संतोष साबळे यांनी पार पाडली.
IMaeEzflPip