वनविभागाच्या प्रयत्नांना आठवड्यानंतर यश
पाथर्डी । वीरभूमी - 05-Nov, 2020, 12:00 AM
गेल्या पंधरा दिवसापासून गर्भगिरी डोंगर परिसरात धुमाकूळ घालणारा बिबट्या अखेर आज पहाटे सावरगाव परिसरात लावण्यात आलेल्या पिंजर्यात अडकला. पिंजर्यात अडकलेला बिबट्या हाच नरभक्षक आहे की, नाही याचा शोध घेतला जात आहे.
मागील आठवड्यात शिरापूर, मढी व केळवंडी परिसरातील तीन बालकांचा बिबट्याने जीव घेतला होता. यामुळे परिसरात भितीचे वातावरण तयार झाले होते. आता बिबट्या जेरबंद झाल्याने नागरिकांना दिलासा मिळाला आहे.
मागील काही दिवसापूर्वी मढी, केळवंडी व शिरापूर येथील तीन लहान बालकांवर हल्ला करत बिबट्याने ठार केले होते. शिरापूर येथील घटनेनंतर नागरिकांच्या भावना तीव्र झाल्या होत्या. या घटनेनंतर बिबट्याला जेरबंद करण्याची मागणी होत होती. यामुळे वनविभागाने तातडीने हालचाली करून बिबट्या जेरबंद करण्यासाठी जळगाव, नाशिक, औरंगाबाद, पुणे, नगर, बीड जिल्ह्यातील पथके ठाण मांडून होते. मात्र आठदिवसाचा कालावधी लोटला तरी बिबट्या जेरबंद होत नसल्याने नाराजी व्यक्त होत होती.
वनविभागाने गर्भगिरी डोंगर रांगाच्या परिसरात ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणात पिंजरे लावण्यात आली होती. गुरुवारी पहाटेच्या सुमारास बिबट्या सावरगाव परिसरात लावण्यात आलेल्या पिंजर्यात बिबट्या अलगद अडकला. पिंजर्यात शिकार म्हणुन ठेवलेला बोकड बिबट्याने अर्धा फस्त केला.
या बिबट्याचा वावर हा शिरापूर, मढी, सावरगाव, करडवाडी या परिसरात होता. सावरगाव येथील पिंजर्यात अडकलेला बिबट्या हा वनविभागाला पाहिजे तोच आहे का नाही, याचा शोध घेतला जात आहे. नागरिकांनीही वनविभागाची खात्री पटेपर्यंत सावधानता बाळगावी, असे आवाहन करण्यात येत आहे.
Comments