टपर्या न काढल्यास जामखेड भाजपचे उपोषण
जामखेड । वीरभूमी - 29-Nov, 2020, 12:00 AM
जामखेड नगरपरिषद हद्दीत नगरपरिषदेचा कोणताही ठराव अगर परवानगी नसताना दहा ते पंधरा टपर्या अनधिकृतरीत्या टाकल्या गेल्या आहेत. याकडे नगरपरिषद पदाधिकारी, अधिकारी व अतिक्रमण विभागाने दुर्लक्ष केले आहे सदर टपर्या दहा दिवसात काढल्या गेल्या नाहीतर नगरपरिषद समोर उपोषणाला बसणार असल्याचे निवेदन भाजप शहराध्यक्ष व नगरसेवक बिभिषन धनवडे, अमित चिंतामणी व सोमनाथ राळेभात यांनी नगरपरिषद मुख्याधिकारी यांना निवेदन देऊन केली आहे.
भाजप शहराध्यक्ष बिभिषन धनवडे, अमित चिंतामणी व माजी शहराध्यक्ष नगरसेवक सोमनाथ राळेभात यांनी मुख्याधिकारी मिनिनाथ दंडवते यांची भेट घेऊन चर्चा केली. सदर टपर्या टाकणार्यांनी ग्रामपंचायत असताना असे ठराव झाले आहेत असे सांगितले. परंतु असे कोणताच ठराव नाही. तसेच नगरपरिषद स्थापन होऊन साडेपाच वर्ष झाले. याबाबत काहीच निर्णय झालेला नाही यामध्ये नगरपरिषदेचे काही कर्मचारी सामील असल्याचे निदर्शनास आले आहे.
नगरपरिषदेच्या हद्दीत मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण होत असून दिवसा टपर्या टाकल्या जात आहेत. या अतिक्रमणांमुळे रस्ते अरुंद होत चालले असून वाहतुकीची कोंडी मोठ्या प्रमाणावर होत आहे. याबाबत नगरपरिषदे कडून कोणतीच कारवाई केली जात नाही. सदर अतिक्रमण येत्या दहा दिवसात न काढल्यास नगरपरिषद कार्यालयासमोर उपोषणाला बसण्याचा इशारा निवेदनाद्वारे दिला आहे.
याबाबतचे निवेदन नगरसेवक बिभिषण धनवडे, अमित चिंतामणी, सोमनाथ राळेभात, अनिल जगदाळे, राहूल राऊत, ऋषिकेश मोरे, युवा मोर्चाचे शहराध्यक्ष अभिजीत राळेभात यांनी दिले आहे.
Comments