बिबट्याचा पुन्हा महिलेवर हल्ला
आष्टी । वीरभूमी- 29-Nov, 2020, 12:00 AM
आष्टी तालुक्यात बिबट्याने माणसांवर हल्ला करण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली असून दोघांचा बळी घेतल्याने आज पुन्हा गवत घेण्यासाठी शेतात गेलेल्या महिलेवर बिबट्याने हल्ला केला आहे. ही घटना आज सकाळी 11.30 वाजता आष्टी तालुक्यातील पारगाव येथे घडली आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून या नरभक्षक बिबट्याचा तातडीने बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे.
आठ दिवसापूर्वी सुरुडी येथे एक, दोन दिवसापूर्वी किन्ही गावात एक असे दोन जणांचा बळी घेतल्यानंतर शनिवारी मंगरुळ येथे मायलेकरांवर बिबट्याने हल्ला करून जखमी केले होते. यानंतर आज सकाळी 11.30 वाजता पारगाव येथील शालन शहाजी भोसले या गवत घेवून घरी येत असतांना बिबट्याने त्यांच्यावर झडप घातली. या हल्ल्यात त्या जखमी झाल्या असून त्यांना आष्टी ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
नगर जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या आष्टी तालुक्यातील गावांमध्ये बिबट्याची दहशत निर्माण झाली असून भितीचे वातावरण तयार झाले आहे.
Comments