वनविभागाला आणखी किती बळी हवेत?
नागरिकांचा सवाल । नरभक्षक बिबट्याचा उच्छाद । पाथर्डी व आष्टी तालुक्यात आतापर्यंत सहा बळी
अहमदनगर । वीरभूमी - 30-Nov, 2020, 12:00 AM
मागील महिण्यात नरभक्षक बिबट्याने पाथर्डी तालुक्यात तीन बालकांचे बळी घेतल्यानंतर या महिण्यात आष्टी तालुक्यातील तीन जणांचे बळी घेतले आहे. या बिबट्याला जेरबंद करण्यासाठी वनविभागाची वेगवेगळी पथके तैनात करण्यात आली आहेत. मात्र अद्याप बिबट्याचा ठावठिकाणा लागला नाही. दरम्यान पाथर्डी तालुक्यात तीन बिबट्या मादी जेरबंद झाल्या. मात्र नरभक्षक बिबट्या अद्यापही मोकाट असून त्याचे माणसावरील हल्ले वाढले आहेत. या नरभक्षक बिबटयाला जेरबंद करण्यासाठी किंवा ठार मारण्यासाठी वनविभाग आणखी किती बळी जाण्याची वाट पाहत आहे? असा सवाल नागरिकांमधून विचारला जात आहे.ऑक्टोबर महिण्यात नरभक्षक बिबट्याने पाथर्डी तालुक्यात उच्छांद मांडला होता. मढी, केळवंडी व शिरापूर येथून लहान बालकांना अलगत उचलून घेवून जात ठार मारले होते. या घटनांनंतर या नरभक्षक बिबट्याला पकडण्यासाठी जळगाव, औरंगाबाद, नाशिक, पुणे आदी ठिकाणांहुन तज्ज्ञांची पथके बोलावण्यात आली होती. या बिबट्याला पकडण्यासाठी गर्भगिरी डोंगर रांगाच्या परिसरात पिंजरे लावण्यात आली. यामुळे या पिंजर्यात तीन मादी बिबटे जेरबंद झाले. मात्र नरभक्षक बिबट्या मोकाटच राहीला.
पाथर्डी तालुक्यात लावण्यात आलेल्या पिंजर्यामुळे नरभक्षक बिबट्याने आपला मोर्चा लगत असलेल्या आष्टी तालुक्याकडे वळवला. पाथर्डी तालुक्यात या नरभक्षक बिबट्याने सायंकाळची वेळ असतांना तीन लहान बालकांना उचलून नेहुन ठार केले होते. मात्र आष्टी तालुक्यातील तीनही घटनांमध्ये 30 ते 40 वर्षे वयांच्या व्यक्तींवर हल्ला करत ठार मारले. विशेष म्हणजे यातील दोन हल्ले दिवसाच झाले होते. त्याचप्रमाणे आणखी केलेल्या हल्ल्यात काहीजण जखमी झाले. हे हल्लेही दिवसाच केलेले आहेत.
काल आष्टी तालुक्यातील पारगाव जोगेश्वरी येथे एकाच दिवसात सकाळी व सायंकाळी हल्ले करत एका महिलेला ठार केले तर एका महिलेला जखमी केले. या घटनेने परिसरात भितीचे वातावरण निर्माण झाले असून नरभक्षक बिबट्याला पकडण्यासाठी करण्यात येणार्या उपाययोजना तोडक्या असल्याचे दिसून येते. या नरभक्षक बिबट्याला पकडण्यासाठी वनविभागाने योग्य त्या उपाय योजना कराव्यात, अशी मागणी होते आहे.
*आष्टी तालुक्यात तिसरा बळी; पारगाव जोगेश्वरीत महिलेच्या नरडीचा घेतला घोट*
आष्टी तालुक्यातील पारगाव जोगेश्वरी येथे सकाळी एका महिलेवर बिबट्याने जीवघेणा हल्ला केल्यानंतर सायंकाळी सहाच्या सुमारास बिबट्याने एका महिलेचा बळी घेतला आहे. सायंकाळी साडेसहाच्या सुमारास ही घटना घडली. यामुळे नरभक्षक बिबट्याचा आष्टी तालुक्यातील हा तिसरा बळी ठरला आहे. सुरेखा नीळकंठ बळे (वय 45) असे बिबट्याच्या हल्ल्यात ठार झालेल्या महिलेचे नाव आहे. सकाळी महिलेवर जीवघेणा हल्ला व सायंकाळी गेलेला बळी यामुळे आष्टी तालुका सुन्न झाला आहे. सुरेखा बळे या पारगाव जोगेश्वरी येथील शेतवस्तीवर कुटुंबासह राहतात. रविवारी सायंकाळी सहाच्या सुमारास त्या घराच्या पाठीमागे शौचासाठी गेल्या होत्या. यावेळी बिबट्याने त्यांना मानेला धरून उचलून नेत तुरीच्या शेतात नेले. बराच वेळ होऊनही त्या परत न आल्याने कुटुंबीयांनी शोधाशोध केली असता तुरीच्या शेतात छिन्नविछिन्न अवस्थेतील मृतदेह आढळून आला. या घटनेने खळबळ उडाली आहे. सकाळी शालनबाई शहादेव भोसले (वय 60, रा. बोराडेवस्ती, पारगाव जोगेश्वरी) या महिलेवर साडेअकराच्या सुमारास बिबट्याने हल्ला केला. त्यात मानेला गंभीर जखमा झाल्याने त्यांना नगरला हलविण्यात आलेले आहे.
jAnhQiuqeHUXsN