लिलावधारकाला सव्वा पाच कोटीचा दंड; दंड न भरल्यास स्थावर मालमत्तेचा होणार लिलाव
शेवगाव । वीरभूमी - 10-Dec, 2020, 12:00 AM
वाळू लिलावधारकाने मंजूर साठ्यापैकी अतिरिक्त उत्खनन केल्याप्रकरणी लिलावधारकाला पाच कोटी 26 लाख 28 हजार 825 रुपयाचा महसूल विभागाने दंड ठोठावला होता. मात्र लिलावधारकाने दंड न भरल्याने जप्त केलेली स्थावर मालमत्ता विक्री करण्यासाठी शेवगावच्या तहसीलदार अर्चना भाकड यांनी लेखी नोटीस काढल्याने धाबे दणाणले आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी की, शेवगाव तालुक्यातील मुंगी येथील गोदावरी नदी पात्रातील वाळु साठा क्र. 3 चा लिलाव मुजाहिद इब्राहिम पठाण (रा. शहानगर, सातारा परिसर, बीड बायपास, औरंगाबाद) याने घेतला होता. या लिलावानुसार लिलावधारकाला पाच हजार 371 ब्रास वाळू उचल करावयाची होती. मात्र लिलावधारकाने मंजूर साठ्यापैकी अतिरिक्त उत्खनन केले होते. यामुळे तहसीलदार यांनी लिलाव झालेल्या वाळू साठा क्र. 3 चे उत्खनन केलेल्या जागेची पाहणी करून मोजणी केली असता त्यामध्ये लिलावधारकाने मंजूर साठ्यापैकी अतिरिक्त दोन हजार 72 ब्रास वाळू उपसा केल्याचे आढळून आले.
यावर तहसीलदार यांनी संबधित लिलावधारक मुजाहिद पठाण याला पाच कोटी 26 लाख 28 हजार 825 रुपयाचा दंड ठोठावला होता. मात्र ही दंडाची रक्कम न भरल्यामुळे लिलावधारकाची शेवगाव येथील गट नंबर 438 मधील 0.69 आर क्षेत्र जप्त करण्यात आले होते. या जप्त करण्यात आलेल्या स्थावर मालमत्तेचा जाहीर लिलाव दि. 17 डिसेंबर 2020 रोजी सकाळी 11 वाजता शेवगाव तहसील कार्यालयात ठेवण्यात आला आहे. लिलावधारकाने लिलावाच्या वेळे अगोदर दंडाची रक्कम न भरल्यास या स्थावर मालमत्तेचा लिलाव होणार आहे. याबाबतचे आदेश तहसीलदार अर्चना भाकड यांनी काढले आहेत.
Nagesh