अहमदनगर । वीरभूमी - 18-Dec, 2020, 12:00 AM
गेल्या दोन महिण्यांपासून अहमदनगर जिल्ह्यासह औरंगाबाद, बीड व सोलापूर जिल्ह्यातील तब्बल 11 जणांचा बळी घेणार्या बिबट्याला अखेर शार्पशुटरने ठार मारले. या बिबट्याने सोलापूर जिल्ह्यातील बिबटरगावमध्ये ठार मारण्यात शुक्रवारी वनविभागाला यश आले. या बिबट्याने पैठण तालुक्यातील दोन, पाथर्डी तालुक्यात तीन, आष्टी तालुक्यात तीन तर सोलापूर जिल्ह्यात तीन अशा 11 जणांचा बळी घेतला आहे.
या नरभक्षक बिबट्याने औरंगाबाद, अहमदनगर, बीड व सोलापूर जिल्ह्यात धुमाकुळ घालत 11 जणांचा बळी घेतला होता. तर अनेकांना जखमी केले होते. या बिबट्यापासून नागरिकांच्या जीवाचे संरक्षण करण्यासाठी नरभक्षक बिबट्या बेशुद्ध करून पकडा, तो प्रयत्न फसल्यास गोळ्या घालून ठार मारण्याचा आदेश रविवारी (दि.6) प्रधान मुख्य वनसंरक्षक नितीन काकोडकर यांनी दिले होते. या आदेशानुसार, बिबट्याला पकडण्यासाठी वनविभागाने 40 ट्रॅप कॅमेरे लावले होते. तसेच, तीन बेशुद्ध करण्यासाठी पथके, दोन शार्पशूटर, 5 हत्यारांसह पोलिस, नाशिक येथील दोन डॉग स्कॉड आहेत आणि थर्मल सेन्सर इमेज ड्रोन कॅमेर्याचा वापर करण्यात आला होता.
यासोबतच, पुणे, जुन्नर, सोलापूर व नगर येथील वनविभाचे 100 पेक्षा जास्त अधिकारी, कर्मचारी या मोहिमेत सहभागी आहेत. 17 पथकाच्या माध्यमातून नरभक्षक बिबट्याची शोध मोहिम सुरू होती. तसेच काटगाव (तुळजापूर) येथील कोळी समाजाचे 25 लोक त्यांच्याकडील 17 कुत्री घेऊन बिबट्या पकडण्याच्या मोहिमेवर होते.
मागील आठवड्यात या नरभक्षक बिबट्याला पकडण्यासाठी चिखलठाण येथे उसाचा फड पेटवला होता. पण, त्यातून नरभक्षक बिबट्या निसटला होता. मागील 15 दिवसांपासून त्यास गोळ्या घालण्यासाठी यंत्रणा फिरत होती. पण, चकवा देऊन बिबट्या प्रत्येक वेळेस निसटत होता.
मागील आठ दिवसांपासून बिबट्याच्या हालचाली मंदावल्या होत्या. यातच, तो करमाळा तालुक्यातून माढा तालुक्याकडे सरकल्याची शक्यता गृहीत धरून तपास सुरू होता. पण, शुक्रवारी बिबट्या पांडुरंग राखुडे यांच्या केळीच्या फडात असल्याचे कळताच वनविभाग व शार्पशूटरने त्यास घेरले आणि शुक्रवारी (दि. 18) रोजी सव्वा सहा वाजता त्यास ठार केले.
Comments