श्रीगोंदा तहसिलदारांची म्हसे येथील घोड नदीपात्रात धडाकेबाज कारवाई
श्रीगोंदा । वीरभूमी - 19-Dec, 2020, 12:00 AM
नव्याने रुजू झालेले तहसीलदार प्रदीपकुमार पवार यांनी आज सकाळी म्हसे (ता. श्रीगोंदा) या गावातील घोड नदीपात्रात वाळूतस्करांवर कारवाई करत वाळू चोरांच्या लाखो रुपये किंमतीचा बोटी जिलेटीनच्या साहाय्याने उध्दवस्त करून वाळू तस्करांना एक प्रकारे गर्भित इशाराच दिला आहे. या कारवाईच्या धडाकेबाज आवाजाने तालुक्यातील वाळू तस्करांचे धाबे दणाणले आहेत.
कारवाई बाबत सविस्तर वृत्त असे की, तहसीलदारांच्या भरारी पथकाने म्हसे शिवारातील घोड नदीपात्रात आज पहाटे छापा टाकून वाळू चोरी करणाऱ्या ४० लाख किंमतीच्या चार बोटी जिलेटीनचा स्फोट करीत उद्धवस्त केल्या आहेत. तसेच, दहा लाखाचा ट्रक जप्त करण्यात आला आहे.
जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांच्या आदेशानुसार स्थानिक महसुल प्रशासनाने वाळू तस्करांवर ही कारवाई केली आहे. रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत या ठिकाणी वाळूची तस्करी चालू होती. याविषयी गुप्त माहीती मिळताच तहसीलदार प्रदिप पवार यांनी शनिवारी पहाटे चार वाजता मंडलाधिकारी प्रशांत कांबळे, भरत चौधरी आणि कामगार तलाठी पोटे व पवन मोरे यांच्या समवेत चार बोटी व एक ट्रक म्हसे येथील माळवाडी शिवारात नदी पात्रात पकडले व बेलवंडी पोलिसांच्या ताब्यात दिले आहेत.
या कारवाईमुळे तालुक्यातील गौण खनिज चोरटे नक्कीच धसका घेतील. अवैध वाळू चोरांवर तहसीलदार पवार यांनी यापुढेही कारवाई करून त्यांचा पूर्ण बंदोबस्त करावा अशी पर्यावरण प्रेमी नागरिकांची मागणी आहे. या कारवाई मूळे तालुक्यातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.
tnUfyQZTNCgbJR