यातील एखादा कागद कमी असला तरी आपला अर्ज बाद होवू शकतो
अहमदनगर । वीरभूमी - 19-Dec, 2020, 12:00 AM
राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील 14 हजार 234 ग्रामपंचायतीसह अहमदनगर जिल्ह्यातील 767 ग्रामपंचायतीची सार्वत्रिक निवडणूक जाहीर केली आहे. या ग्रामपंचायतींसाठी 15 जानेवारी 2021 रोजी मतदान होत आहे. या निवडणुकीसाठी 23 डिसेंबर पासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी प्रारंभ होत आहे. उमेदवारी अर्ज दाखल करतांना इच्छुक उमेदवाराने खालील प्रमाणे कागदपत्र जोडणे गरजेचे आहे.
राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केल्याप्रमाणे दि. 23 डिसेंबर ते 30 डिसेंबर उमेदवारी अर्ज दाखल करावयाचे आहेत. दि. 31 डिसेंबर 2020 रोजी दाखल अर्जाची छाननी होवून दि. 4 जानेवारी पर्यंत अर्ज माघारीची मुदत आहे. त्याच दिवशी राहीलेल्या उमेदवारांना चिन्ह वाटप केले जाणार असून दि. 15 जानेवारी 2021 रोजी मतदान होणार आहे. तर दि. 18 जानेवारी 2021 रोजी मतमोजणी होवून विजयी उमेदवारांची घोषणा करण्यात येणार आहे.
मात्र ग्रामपंचायत निवडणुकीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांनी उमेदवारी अर्ज भरल्यानंतर त्यासोबत खालीली प्रमाणे कागदपत्रे जोडणी आवश्यक आहे. यापैकी एखादा कागद कमी असला तरी आपला दाखल अर्ज छाननीमध्ये बाद होवू शकतो. यामुळे इच्छुकांनी आतापासूनच कागदपत्रांची जुळवाजुळव करण्याची तयारी केली तर चांगले.
उमेदवारी अर्ज दाखल करतांना लागणारी कागदपत्रे पुढीलप्रमाणे-
1) उमेदवाराच्या ऑनलाईन भरलेल्या फॉर्मची प्रत आवश्यक त्या ठिकाणी स्वाक्षरीसह असावा. 2) ग्रामपंचायतीच्या मतदार यादीत उमेदवाराचे नाव ज्या पानावर आहे, त्या पानाची साक्षांकित झेरॉक्स प्रत. 3) अनामत रक्कम पावती ः राखीव प्रवर्गासाठी 100 रुपये व सर्वसाधारण उमेदवारासाठी 500 रुपये. 4) राष्ट्रीयकृत बँकेत निवडणुकीसाठी नवीन बँक खाते उघडून त्या पासबुकची झेरॉक्स प्रत.
5) मत्ता व दायित्व घोषणापत्र (विहीत नमुन्यातील). 6) दिनांक 12 सप्टेंबर 2001 नंतरच्या हयात अपत्यांची संख्या दोन पेक्षा अधिक नसल्याबाबतचे उमेदवाराचे घोषणापत्र. 7) गुन्हेगारी पार्श्वभूमी नसलेबाबतचे विहीत नमुन्यातील प्रमाणपत्र. 8) राखीव प्रवर्गाच्या उमेदवारांसाठी जात वैधता प्रमाणपत्र प्रत अथवा जात प्रमाणपत्र नसल्यास समितीकडे सादर केलेल्या प्रस्तावाची पोहोच पावती. 9) सदर पोहचसोबत जात वैधता प्रमाणपत्र निवडून आल्यानंतर 12 महिण्यांच्या आत सादर करण्याचे हमीपत्र. 10) दैनिक खर्च व एकूण केलेला निवडणूक खर्च विहीत मुदतीत सादर करण्याचे हमीपत्र. 11) दिनांक 30 डिसेंबर 2020 रोजी वयाची 20 वर्षे पूर्ण होत असल्याबाबतचा पुरावा.
12) ग्रामपंचायतीकडून उमेदवारांनी पुढील प्रमाणपत्रे घेऊन अर्जासोबत जोडावीत. 1) ग्रामपंचायत बे-बाकी अथवा थकबाकीदार नसल्याबाबतचे प्रमाणपत्र. 2) ग्रामपंचायतीचा ठेकेदार नसल्याचे प्रमाणपत्र. 3) शौचालय असल्याचे प्रमाणपत्र. 4) शौचालय वापरत असल्याबाबत विशेष ग्रामसभेतील मंजूर ठरावाची प्रत. 5) अपवादात्मक परिस्थितीत विशेष ग्रामसभा आयोजित होऊ शकली नाही तर सहाय्यक गटविकास अधिकारी यांच्याकडील ग्रामसेवकाच्या शिफारसीवरून देण्यात आलेले शौचालय वापराबाबतचे प्रमाणपत्र.
Comments