सातवर्षानंतर आरोपी पत्नी शांताबाईला अटक । आरोपीला 28 पर्यंत पोलिस कोठडी
शेवगाव । वीरभूमी - 24-Dec, 2020, 12:00 AM
अखेर शेवगाव शहरातील रामचंद्र उर्फ रामजी सातपुते यांच्या खुन्याचा तब्बल सात वर्षांनी तपास लावण्यात पोलिसांना यश आले आहे. रामजी सातपुते यांच्या पत्नी शांताबाई सातपुते यांनीच त्यांची हत्या केल्याचा सबळ पुरावा पोलिसांना मिळाला असून त्यांना अटक केली आहे. आरोपी शांताबाई रामजी सातपुते यांना अटक करून न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने 28 पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.
शेवगाव शहरातील शास्त्रीनगर येथील रामचंद्र उर्फ रामजी साहेबराव सातपुते यांना दि. 8 सप्टेंबर 2013 रोजी रात्री 1.30 वाजेच्या सुमारास पिस्टलच्या दोन गोळ्या लागून गंभीर जखमी होवून मृत्यू झाला होता.
याबाबत शेवगाव पोलिस ठाण्यात आक्समात मृत्यूची नोंद करण्यात आली होती. सदर आकस्मात मृत्यूच्या तपासात तत्कालिन पोनि. सुरेश सपकाळे यांनी सरकारतर्फे फिर्यादी होवून मयताची पत्नी श्रीमती शांताबाई रामचंद्र उर्फ रामजी सातपुते हिचेविरुद्ध दि. 30 डिसेंबर 2017 रोजी शेवगाव पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
खुनाचा गुन्हा दाखल झाल्यानंतर तत्कालिन पोलिस अधीक्षक यांनी सदर गुन्ह्याचा तपास पोलिस निरिक्षक यांच्याकडून उपविभागिय पोलिस अधिकारी यांच्याकडे वर्ग केला होता. त्यानंतर शेवगावचे उपविभागीय पोलिस अधिकारी सुदर्शन मुंढे यांनी सदर गुन्ह्याचा बारकाईने तपास करून औरंगाबाद येथील घाटी रुग्णालयाच्या न्यायवैधक विभाग प्रमुख तसेच मुंबई येथील न्यायसहाय्यक वैज्ञानिक विभागाचे बॅलेस्टिक एक्सपर्ट यांचेकडून अभिप्राय प्राप्त करून घेतला.
त्यामध्ये सदर गुन्ह्यातील आरोपी श्रीमती शांताबाई रामचंद्र उर्फ रामजी सातपुते (मयताची पत्नी) हिचेविरुद्ध पुरावा मिळून आल्याने तीस सदर गुन्ह्याचे कामी दि. 23 डिसेंबर 2020 रोजी 5 वाजता अटक करून आज दि. 24 रोजी शेवगाव प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी यांचे न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने सदर आरोपीस दि. 28 डिसेंबर 2020 पर्यंत पोलिस कस्टडी रिमांड देण्यात आला.
सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलिस अधीक्षक मनोज पाटील व अपर पोलिस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल यांचे मार्गदर्शनाखाली उपविभागिय पोलिस अधिकारी सुदर्शन मुंढे, उपविभाग पोहेकॉ. नितिन दराडे, पोना. संजय बडे, म.पो.कॉ. रोहिणी घरवाढवे करीत आहेत.
Comments