सदस्य होण्यासाठी सातवी पासची अट । ऐन उमेदवारी अर्ज भरण्याच्या काळातच इच्छुकांना धक्का
मुंबई । वीरभूमी- 25-Dec, 2020, 12:00 AM
राज्यातील 14 हजार 234 ग्रामपंचायतीसह नगर जिल्ह्यातील 767 ग्रामपंचायत निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे. मात्र नुकतंच निवडणूक आयोगाने सदस्यांपासून ते सरपंचपदापर्यंत किमान सातवी पास ही अट ठेवण्यात आल्याने एकच खळबळ उडाली आहे.
या अगोदर सरपंचपदाचे आरक्षण सोडत मतदानानंतर ठेवल्याने उडालेल्या गोंधळात सातवी पासच्या अटीमुळे भर पडली आहे.
राज्य निवडणूक आयोगाने 14 हजार 234 तर जिल्ह्यातील 767 ग्रामपंचायतींसाठीचा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. 15 जानेवारीला प्रत्यक्ष मतदान होणार आहे. त्यासाठी 23 डिसेंबरपासून अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे. महाविकास आघाडी सरकारने भाजप काळातील थेट सरपंच निवडीचा निर्णय रद्द करत, सदस्यातून सरपंच निवडीचा निर्णय घेतला. तसंच यावेळी सरपंच आरक्षण सोडत ही निवडणुकीपूर्वी न होता, ती निवडणुकीनंतर होणार आहे. या सर्व प्रकारावरुन विरोधकांनी महाविकास आघाडी सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे.
अशा परिस्थितीत राज्य निवडणूक आयोगाचा नवा आदेश समोर आला आहे. या निवडणुकीमध्ये सदस्य आणि सरपंच उमेदवाराबाबतचे निकष स्पष्ट करण्यात आले आहेत. निवडणूक आयोगाने 24 डिसेंबरला अध्यादेश जारी केला आहे. यामध्ये निवडणूक अर्ज भरताना अर्जदार 21 वर्षापेक्षा कमी वयाचा नसावा, उमेदवाराचं नाव मतदार यादीत असावं. तर उमेदवार जर 1 जानेवारी 1995 रोजी किंवा त्यानंतर जन्मलेला असेल आणि ज्यांना कोणत्याही कायद्याने बाद ठरवलं नसेल, त्यांना सातवी पास असल्याशिवाय सरपंच म्हणून निवडून दिलं जाऊ शकणार नाही, असे म्हटले आहे.
LnJFmChuGYRKf