तिसगाव । वीरभूमी - 17-Feb, 2023, 12:57 AM
तिसगावचा आठवडे बाजार नियोजित ओट्यावर भरविण्याच्या मागणीसाठी सुभाष खंडागळे, वाल्मिक गारुडकर व सिराज शेख यांनी ग्रामपंचायत कार्यालयासमोर उपोषण सुरु केले. दरम्यान गटविकास अधिकारी, पोलिस प्रशासन व सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्याशी चर्चा करुन पुढील आठवड्यापासून तिसगावचा आठवडे बाजार ओट्यावर भरविला जाईल, असे ग्रामविकास अधिकारी यांनी लेखी आश्वासन दिल्यानंतर उपोषण मागे घेण्यात आले.
पाथर्डी तालुक्यातील मोठी बाजारपेठ असलेल्या तिसगावचा आठवडे बाजार हा नियोजित ओट्यावर न भरता महामार्गालगत भरत आहे. यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत असून अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. रस्त्यावरील बाजारामुळे तिसगावचे नाव बदनाम होत आहे.
हे थांबविण्यासाठी दि. 16 फेब्रुवारी रोजीचा आठवडे बाजार हा नियोजित ओट्यावर भरविण्याच्या मागणीसाठी सुभाष खंडागळे, वाल्मिक गारुडकर व सिराज शेख यांनी तिसगाव ग्रामपंचायत प्रशासनाला उपोषण करण्याचा इशारा निवेदनाद्वारे दिला होता. मात्र आंदोलन कर्त्यांनी उपोषणाचा इशारा देऊनही गुरुवारी भरणारा आठवडे बाजार हा ओट्यावर बसविण्यात ग्रामपंचायत प्रशासन अपयशी ठरले.
यामुळे आठवडे बाजार हा पुन्हा ओट्यावर न भरता महामार्गालगत भरल्याने निवेदनकर्त्यांनी ग्रामपंचायत कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले. यामुळे ग्रामपंचायत प्रशासनाची धांदल उडाली.
दुपारी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी डॉ. जगदीश पालवे, सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रवीण पाटील यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेऊन चर्चा करत पुढील गुरुवारपासून आठवडे बाजार ओट्यावर भरविण्याबाबत उपाय योजना करण्याचे आश्वासन दिले. मात्र याबाबत लेखी द्यावे, अशी मागणी केली.
यावर तिसगावचे ग्रामविकास अधिकारी यांनी पोलिस प्रशासन, गटविकास अधिकारी, सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्या मदतीने दि. 23 फेब्रुवारीपासूनचा आठवडे बाजार हा नियोजित ओट्यावर भरविण्याबाबत लेखी आश्वासन दिल्यानंतर उपोषण मागे घेण्यात आले.
यावेळी उपोषणकर्त्यासह माजी ग्रामपंचायत सदस्य नंदकुमार लोखंडे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.
...तर गुन्हे दाखल करा
तिसगावच्या आठवडे बाजाराबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाने हद्द ठरवून द्यावी. महामार्गालगत बाजार करू बसणार नाहीत, याबाबत विक्रेत्यांना सुचना द्याव्यात. गावामध्ये भोंग्यावरुन याबाबत जाहीर सुचना द्याव्यात. एवढे करुनही बाजारकरु ओट्यावर बसण्याऐवजी महामार्गालगत बसल्यास त्यांच्यावर कलम 353 प्रमाणे गुन्हे दाखल करावेत, अशी सुचना सपोनि. प्रवीण पाटील यांनी ग्रामविकास अधिकार्याना केल्या.
OovRSsMDNztC