भाजपाच्या 12 आमदारांचे निलंबन
तालिका अध्यक्षांना धक्काबुक्की, शिवीगाळ केल्याप्रकरणी कारवाई
मुंबई । वीरभूमी - 06-Jul, 2021, 12:00 AM
विधानसभा सभागृहात गोंधळ घालतानाच तालिका अध्यक्ष भास्कर जाधव यांच्याशी गैरवर्तन केल्याप्रकरणी भाजपच्या तब्बल 12 सदस्यांना विधानसभेतून निलंबित करण्यात आलं आहे. त्यात आशिष शेलार, गिरीश महाजन, जयकुमार रावल, संजय कुटे या माजी मंत्र्यांचाही समावेश आहे.विधिमंडळ अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी आज अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी ओबीसी आरक्षणाशी संबंधित एक ठराव मांडला. केंद्र सरकारकडून इम्पिरिकल डेटा मिळवण्यासंबंधी हा ठराव होता. त्यास भाजपच्या सदस्यांनी जोरदार विरोध केला. त्यावेळी काही सदस्यांनी सभागृहात गोंधळ घातला. तालिका अध्यक्षासमोरचा माइक व राजदंड पळवण्याचा प्रयत्न करण्यात आला. सभागृह तहकूब झाल्यानंतरही हे सदस्य शांत झाले नाहीत. त्यांनी अध्यक्षांच्या दालनातही गोंधळ घातला. अध्यक्षांना शिवीगाळ केली. स्वत: तालिका अध्यक्षांनी ही माहिती देत तीव्र नाराजी व्यक्त केली.
भाजप सदस्यांच्या या गैरवर्तनाची गंभीर दखल घेत सत्ताधारी पक्षानं निलंबनाचा ठराव आणला. संसदीय कामकाज मंत्री अनिल परब यांनी हा ठराव मांडला. हा ठराव आवाजी मतदानानं मंजूर करण्यात आला. त्यानुसार, भाजपच्या 12 सदस्यांना एक वर्षासाठी सभागृहातून निलंबित करण्यात आलं आहे. त्यात संजय कुटे, आशिष शेलार, अभिमन्यू पवार, गिरीश महाजन, अतुल भातखळकर, पराग अळवणी, हरीश पिंपळी, राम सातपुते, जयकुमार रावल, योगेश सागर, नारायण कुचे, कीर्तिकुमार (बंठी) भांगडिया यांचा समावेश आहे. निलंबित सदस्यांना पुढील वर्षभर मुंबई व नागपूर विधिमंडळाच्या आवारात प्रवेश करण्यास मनाई करण्यात आली आहे.
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी या कारवाईचा निषेध केला. ’भाजपच्या सदस्यांच्या निलंबनाचा ठराव म्हणजे विरोधकांचं संख्याबळ जाणीवपूर्वक कमी करण्याचा डाव आहे. हा लोकशाहीचा खून आहे. काही सदस्यांनी गैरवर्तन केलं असेल तर अध्यक्षांनी त्यांच्याशी चर्चा करायला हवी. थेट निलंबन करणं योग्य नाही,’ असं फडणवीस यांनी स्पष्ट केलं. फडणवीसांच्या या वक्तव्यानंतर भाजपनं कामकाजावर बहिष्कार टाकत सभात्याग केला.
सदस्यांकडून शिवीगाळ : जाधव
माझा माइक हिसकावून घेतला. माझ्या दालनात घुसले, मला शिवीगाळ केली. धक्काबुक्की केली. राज्याच्या इतिहासात असे कधी घडले नव्हते. माझ्यासाठी आज काळा दिवस आहे, असे तालिका अध्यक्ष भास्कर जाधव म्हणाले.
बहिष्कारानंतर 30 मिनिटांत 7 विधेयके मंजूर
भाजपच्या 12 आमदारांचे निलंबन केल्याप्रकरणी विरोधी पक्षाच्या सदस्यांनी विधानसभा कामकाजावर सोमवारी दुपारी बहिष्कार टाकला होता. ती संधी साधत पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी सत्ताधार्यांनी अवघ्या 30 मिनिटांत तब्बल 7 विधेयके पारित केली. 1. महाराष्ट्र नागरी क्षेत्रे झाडांचे संरक्षण व जतन (सुधारणा) विधेयक 2. महाराष्ट्र परगणा व कुळकर्णी वतने, मुलकी पाटील पद रद्द करणे, सेवा इनामे रद्द करणे (सुधारणा) विधेयक 3. महाराष्ट्र सहकारी संस्था (सुधारणा) विधेयक 4. महाराष्ट्र परिचारिका (सुधारणा) विधेयक 5. महाराष्ट्र राजभाषा (सुधारणा) विधेयक 6. महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ (सुधारणा) विधेयक 7. अॅटलस स्कीलटेक विद्यापीठ, मुंबई विधेयक
Tags :
Hey from Zundee! Happy new year to you! We have made all our databases / client lists available to companies. Companies, People, Job Titles, Phones, Emails, you name it! Visit us: https://zundee.click