काष्टी येथे नगर-दौंड रस्त्यावर भीषण अपघात
श्रीगोंदा । वीरभूमी - 09-Jan, 2021, 12:00 AM
काष्टी (ता. श्रीगोंदा) येथील राष्ट्रीय महामार्ग नगर-दौंड रस्त्यावर अज्ञात वाहनाने धडक दिल्याने अजय वाळूंज (वय वर्षे २२, रा. टाकळी कडेवळीत, ता.श्रीगोंदा) व पवन योगेश खरात (वय वय वर्षे १२, रा. काष्टी (खरातवाडी) ता.श्रीगोंदा) या दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाला असुन घटनेचा पुढील तपास पोलिस निरिक्षक रामराव ढिकले यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, शुक्रवार दि. ८ रोजी रात्री ९ ते १० वाजेच्या सुमारास नगर-दौंड महामार्गावर काष्टी गावाजवळील हाॅटेल शिवनेरी समोर अजय वाळूंज व पवन खरात या तरुणांनी श्रीगोंदा येथून कपडे खरेदी केले व काष्टीच्या दिशेने बुलेट गाडीवर जात असताना एका अज्ञात वाहनाने त्यांना जोराची धडक दिली.
महामार्ग काँक्रीट असल्याने त्यांना जोराचा मार लागला. अपघातानंतर धडक देणारे वाहन पळून गेले. घटनेची माहिती मिळाल्यानंतर बाजार समितीचे मा.उपसभापती वैभव पाचपुते, बंडू जगताप, जयवंत बोत्रे, सुरज राहिंज, प्रशांत भोर, अल्ताफ शेख, अनिल कानडे यांच्यासह गावातील तरुण मदतीला धावले.
अपघातात पवन खरात जागेवरच ठार झाला. तर अजय वाळूंज हा गंभीर जखमी असल्याने त्याला ताबडतोब उपचारासाठी दौंड येथे घेऊन जात असताना रस्त्यातच त्याची प्राणज्योत मालवली.
Comments