काळविटाच्या मांसासह, हत्या करण्यासाठी लागणारे साहित्य, दुचाकी जप्त
शेवगाव । वीरभूमी - 09-Jan, 2021, 12:00 AM
काळविटाची शिकार केल्याप्रकरणी शेवगाव तालुक्यातील कर्हेटाकळी येथील एकावर वन्य प्राणी संरक्षण अधिनियमन 1972 अन्वये वनगुन्हा दाखल केला आहे. वनविभागाच्या कारवाईची चाहुल लागताच आरोपीने पलायन केले. मात्र त्याच्या घरातून वनविभागाच्या कर्मचार्यांनी दुचाकी, काळविट मारण्यासाठी वापरलेली कुर्हाड, सुरे, हरिण धरण्यासाठी वापरलेले जाळे असे साहित्य जप्त केले आहे. गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव पटेल अंकुश पवार (वय 35, रा. कर्हेटाकळी, ता. शेवगाव) असे आहे.
याबाबत समजलेली माहिती अशी की, शेवगाव तालुक्याच्या जायकवाडी धरणाच्या बॅकवाटर परिसरातील कर्हेटाकळी येथे एका जणाने काळविटाची शिकार केल्याची माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी शिरिष निरभवने यांना गुप्त खबर्यामार्फत समजली. यावर निरभवने यांनी ही माहिती वनविभागाचे उपवनसंरक्षक आदर्श रेड्डी, सहाय्यक वनसंरक्षक एस. आर. पाटील यांना कळवली असता त्यांनी संबधित व्यक्ती राहत असलेल्या ठिकाणी छापा टाकण्याचे आदेश दिले.
या आदेशाने निरभवने यांनी वनपाल पांडुरंग वेताळ, वनरक्षक आप्पा घनवट, स्वाती ढोले, नौशाद पठाण, वनसेवक विष्णू सोले यांनी कर्हेटाकळी येथे पाठवून छापा टाकण्याचे आदेश दिले. या आदेशाने कर्हेटाकळी येथील पटेल अंकुश पवार याच्या घरावर छापा टाकला असता त्यांना घरामध्ये काळविटाचे मांस, काळविट मारण्यासाठी वापरण्यात आलेली कुर्हाड, धारदार सुरे, काळविट पकडण्यासाठी लागणारे जाळे व एक दुचाकी असे साहित्य जप्त केले.
वनविभागाच्या पथकाची चाहुल लागताच आरोपी पटेल अंकुश पवार हा पसार झाला. वनविभागाच्या कर्मचार्यांनी सर्व साहित्य जप्त करून पाथर्डी येथील वनविभागाच्या कार्यालयात घेवून गेले. तेथे पटेल अंकुश पवार (वय 35, रा. कर्हेटाकळी) याच्या वन्य प्राणी संरक्षण अधिनियमन 1972 अन्वये वनगुन्हा दाखल केला आहे.
peclITNHRGPKZW