नगर जिल्ह्यात येथे उतरले ड्रोन
ड्रोनपासून नागरिकांनी दूर रहावे; प्रशासन
लतिफ राजे । पारनेर- 07-Aug, 2021, 12:00 AM
पारनेर तालुक्यातील सुतारवाडी व भोकरदरा (ढवळपुरी) परीसरात अज्ञात ड्रोन उतरल्याने (Unidentified drones landed in Sutarwadi and Bhokardara (Dhawalpuri) areas) परिसरात काही काळ खळबळ उडाली. याबाबत कोणालाच काही माहीत नसल्याने परिसरातील नागरिकांमध्ये भितीचे वातावरण तयार झाले होते. मात्र त्यानंतर याबाबत तहसीलदार ज्योती देवरे यांनी नागरीकांना या ड्रोनपासून दूर रहावे (Citizens should stay away from these drones) कोणीही त्याच्या जवळ जाऊ नये असे आवाहन केले होते.रात्री लष्कराचे अधिकारी यांनी ढवळपुरी पसिरात येऊन सदर ड्रोन ताब्यात घेतले. यावेळी टाकळी ढोकेश्वर बिटचे पोलिस, महसूलचे मंडलाधिकारी, तलाठी तसेच ढवळपुरीचे सरपंच डॉ. राजेश भनगडे, माजी उपसरपंच संतोष चौधरी आदींसह परिसरातील नागरिक उपस्थित होते.
याबाबत माहिती अशी की, आज (दि. 7) सायंकाळच्या सुमारास सुतारवाडी परिसरात एक अज्ञात ड्रोन उतरल्याने नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले होते. हे ड्रोन नेमके कोणाचे असावे? यात काही धोकादायक तर काही नसेल ना? अशा प्रकारच्या शंका व अफवा परीसरात पसरविण्यात आल्या. या ठिकाणी बघ्यांनी मोठी गर्दी केली होती.
याबाबत तहसीलदार ज्योती देवरे यांनी लष्करी अधिका-यांना कळविल्यानंतर लष्कारीचे अधिकारी मेजर भगिंदरसिंग हे त्या ठिकाणी आल. हे ड्रोन लष्कराचेच असावे असा अंदाज उपस्थितांनी व्यक्त केला आहे. ड्रोन अचानक उतरल्याचे समजल्या नंतर सुतारवाडी परीसरात काही काळ दहशतीचे वातावरण तयार झाले होते. त्यानंतर लष्करी अधिकारी आल्याने परिसरातील नागरिकांचा जीव भांड्यात पडला.
याबाबत सखोल माहिती घेतल्यानंतर समजले की, ढवळपुरीचा बराचसा भाग लष्कराच्या के के रेंज हद्दीत आहे. 15 ऑगस्ट पूर्वी या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात डेमो फायरिंग होणार आहे. तेव्हा या के के रेंज क्षेत्राचा सर्व्हे केला जात आहे. मागील सात-आठ दिवसापासून लष्कराचे 21 ड्रोन दररोज या परिसरात सकाळपासून संध्याकाळपर्यंत टेहळणी करीत असतात. या ड्रोनला नगर तालुक्यातील खारेकर्जुने येथील केंद्रातून संचलित व नियंत्रित केले जाते.
आज 21 ड्रोन पैकी 18 ड्रोन परत लष्करी केंद्रात आले. मात्र यातील एक ड्रोन ढवळपुरी - सुतारवाडी जुना रोड वरील खिंडी जवळील शिवा मिसाळ यांच्या घराच्या परिसरात उतरला, दुसरे ढवळपुरीतीलच भोकरदरा येथे कोसळला तर तिसरा ड्रोन विळद येथे सापडला. या ड्रोनला कॅमेरे, जीपीए प्रणाली असल्याने त्यांचे ठिकाण लष्कराला मिळले.
त्यानंतर लष्कराच्या अधिकार्यांनी रात्री ढवळपुरीतील काही युवकांना सोबत घेऊन सुतारवाडी परिसरातील ड्रोन ताब्यात घेतले. ढवळपुरी परिसरातील के के रेंज हद्दीवर लष्कराने लाल निशाण लावले असून सदर क्षेत्रात मोठ्या प्रमणात फायरिंगचा सराव केला जात आहे. त्यामुळे या परिसरातील नागरिकांना के के रेंज क्षेत्रात प्रवेश करण्यास बंदी घातली आहे.
लष्करी अधिकार्यांना ढवळपुरीतील प्रदीप साळवे, सनी थोरात, केदार जाधव, आसिफ पटेल, राहुल नेटके, पंकज केदारी, किरण केदारी, उत्तम व्यवहारे, किरण बुचुडे आदींनी सहकार्य केले.
cgkeHWtxKiBhPZJw