शेवगाव पालिका प्रशासकाची कारवाई
शेवगाव । वीरभूमी - 14-Feb, 2021, 12:00 AM
शेवगाव नगर परिषदेचे प्रशासक तथा प्रांताधिकारी देवदत्त केकाण यांच्या मार्गदर्शनाखाली नगर परिषदेच्या हद्दीतील थकीत मालमत्ता करधारकांची मालमत्ता सीलबंद करण्याची कारवाई रविवारी ( दि. १४ ) रोजी करण्यात आली.
यात मालमत्ता कर थकीत असणा-यांत हॉटेल संकेत, हॉटेल गारवा व आनंद जिनिंग मिल आदींच्या मालमत्ता सिलबंद करून धडक कारवाई करण्यात आल्याची माहिती नगर परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंबादास गर्कळ यांनी दिली. प्रांताधिकारी केकाण यांच्या मार्गदर्शनाखाली थकीत मालमत्ता कर धारकांविरोधात ही कारवाई दररोज सुरू राहणार असल्याचे गर्कळ यांनी सांगीतले.
शेवगाव नगरपरिषद पदाधिकारी यांची पाच वर्षांची मुदत संपल्याने जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांच्या आदेशानुसार प्रांताधिकारी केकाण यांची प्रशासक म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. प्रशासक केकाण यांनी नगर परिषदेतील सर्व विभाग प्रमुखांची बैठख घेऊन कामकाजाचा आढावा घेतला होता. त्यानंतर थकित मालमत्ता कर धारकांवर कारवाईचे संकेत दिले होते. तसेच अनधिकृत नळजोड अधिकृत करून न घेतल्यास फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे तसेच थकीत मालमत्ता धारकांची यादी चौकात लावण्यात येईल असे जाहिर केले होते.
नगर परिषदेच्या हद्दीतील हॉटेल संकेतकडे ७ लाख ७२ हजार सहा रूपये, हॉटेल गारवाकडे ५९ हजार ४११ रूपये तसेच आनंद कॉटेक्सकडे (जिनिंग मिल ) रक्कम ३ लाख ८८ हजार ७८९ रूपये मालमत्ता कर थकबाकी होती. नगर परिषदेच्या पथकाने प्रशासक तथा प्रांताधिकारी केकाण यांच्या मार्गदर्शनाखाली हॉटेल संकेत, हॉटेल गारवा व आनंद कॉटेक्स (जिनिंग मिल) या तीनही मालमत्ता सीलबंद करण्याची कारवाई केली. प्रांताधिकारी केकाण यांच्या मार्गदर्शनाखाली नगरपरिषदचे मुख्याधिकारी अंबादास गर्कळ, कर अधिक्षक डी. सी. साळवे, करनिरीक्षक डी. बी. कोल्हे, नगररचना विभागाचे खान, वसुली विभागाचे अशोक सुपारे, श्रीकृष्ण ढाकणे, संजय साखरे, गोपी छजलानी, शेकडे, मुरदारे व अतिक्रमण विभागाचे श्री लांडे आदींनी ही धडक कारवाई केली.
थकीत मालमत्ता धारकांची कर वसुली मोहिम सुरू करून नगर परिषदेच्या उत्पन्नात भर पडेल. तसेच त्यामुळे नगर परिषदेच्या कर्मचा-यांच्या वेतनाचा प्रश्न सुटू शकेल. तसेच शहराच्या विकासकामांना चालना मिळेल या उद्देशाने प्रशासक तथा प्रांताधिकारी यांनी धडक कारवाईची मोहिम हाती घेतली आहे.
नागरिकांनी मालमत्ता कर थकबाकी भरून नगर परिषदेला सहकार्य करावे असे आवाहन मुख्याध्याकारी गर्कळ यांनी केले आहे.
Comments