बदनामी करण्याची भिती दाखवून केली जातेय फसवणूक
वीरभूमी डिजीटल- 19-May, 2021, 12:00 AM
फेसबुक या सोशल मीडियावर फ्रेड रिक्वेस्ट पाठवून अगोदर मित्र बनवायचे. व्यक्तीगत चॅटिंग करून स्वतःचा व्हाटस् अॅप क्रमांक देऊन चॅटिंग करायची. चॅटिंग सुरू असतांना सेक्सबाबत व्हिडीओ कॉल करून व्हिडीओ रेकॉर्ड करायचा व नंतर त्या व्यक्तीला काढलेला व्हिडिओ सोशल मीडियावर अपलोड करायची धमकी देत पैशाची मागणी करणार्या रॅकेटने अनेक तरूणांना गंडा घातला आहे. अशा प्रकारे फसवणुक करणार्यांचा शोध घेऊन कडक कारवाई करण्यासाठी सायबर सेल अलर्ट झाला आहे.
सोशल मीडियाचा वापर हा दुधारी तलवारीसारखा आहे. चांगला वापर केला तर चांगले परिणाम होतात तर वाईट वापर केला तर वाईट परिणाम होतात. याचाच फायदा घेत सध्या फेसबुक या सोशल साईटवर अनेक तरूणांना भूरळ घालून गंडा घालण्याचे प्रकार होतांना दिसत आहेत.
या गंडा घालणार्या तरूणी अगोदर फेसबुकवर फे्रंड रिक्वेस्ट पाठवतात. नंतर तरूणांबरोबर मैत्री करून स्वतःचा व्हॉटस् अॅप क्रमांक देऊन पुढील चॅटिंगसाठी संपर्क करण्याचे सांगतात. त्यानंतरची चॅटिंग फेसबुक ऐवजी व्हाटस् अॅपवर सुरू होते. चॅटिंग करतांना तरूणांना उत्तेजीत करून व्हिडीओ कॉल करण्यास भाग पाडतात. एखाद्या तरूणाने व्हिडीओ कॉल नाहीच केला तर त्याला व्हिडीओ कॉल करून चित्रविचित्र हावभाव करायला सुरूवात केली जाते.
या हावभावाचे व संबधितांचे व्हिडीओ कॉलचे रेकॉडिंग करून हे रेकॉडिंग सोशल मीडियावर अपलोड करण्याची धमकी देत खंडणीची मागणी केली जाते. याप्रकारामुळे अनेक तरूण बदनामी नको म्हणुन तरुणींना पैसे देण्यास तयारही होतात. यातूनच मोठ्या प्रमाणात गुन्हेगारी वाढली असल्याची बाब समोर आली आहे.
अशा प्रकारे फसवणूक करणार्या तरूणींचा पोलिस शोध घेत असून साईबर क्राईमचे पथक अलर्ट झाले आहे. मात्र या तरूणी प्रत्येकवेळी आपला क्रमांक व नाव बदलून फसवणूक करत असल्याने त्यांना पकडण्यात पोलिसांना अपयश येत आहे. अशाप्रकारे फसवणूक करणार्यांच्या मागावर सायबर क्राईम असून कोणाची फसवणूक झाली असल्यास त्यांनी सायबर क्राईमशी संपर्क करण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.
तसेच सोशल मीडियावर अनोळखी व्यक्तीशी मैत्री करतांना काळजी घ्यावी. कोणाच्याही भूलथापांना बळी पडू नये, असे आवाहन करण्यात येत आहे.
pmNwkUzhClAQbu