जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांचे आदेश । शेतीमाल विक्रीसाठी पर्यायी व्यवस्था करण्याचेही आदेश
अहमदनगर । वीरभूमी- 18-May, 2021, 12:00 AM
जिल्ह्यातील कोरोना संसर्ग रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणुन जिल्ह्यातील सर्व बाजार समित्यांचे व्यवहार आज मंगळवार दि. 18 मे ते मंगळवार दि. 31 मे या कालावधीत बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी दिले आहेत. बंद काळात शेतकर्यांना आपल्या मालाची विक्री करण्याच्या दृष्टीने बाजार समित्यांनी पर्यायी व्यवस्था विकेंद्रीत पद्धतीने उपलब्ध करून देण्याची जबाबदारी संबधित कृषी उत्पन्न बाजार समितीची राहणार आहे.
जिल्ह्यातील कोरोना बाधितांची वाढती संख्या रोखण्यासाठी जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी प्रतिबंधात्मक उपाय योजना करण्याच्या दृष्टीने जिल्ह्यातील सर्व बाजार समित्या बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. या आदेशात म्हटले आहे की, अहमदनगर जिल्ह्यात सद्यपरिस्थितीत कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत असून दैनंदिनरित्या रुग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणत वाढ होत आहे. त्याअनुषंगाने जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, अहमदनगर यांची दि.17/05/2021 रोजीच्या बैठकीमध्ये झालेल्या चर्चेनुसार सद्यस्थितीमध्ये, जिल्ह्यातील सर्व कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये होणारी गर्दी कोविड 19 चा प्रादुर्भाव वाढण्यास कारणीभूत ठरत असल्याचे निदर्शनास आलेले आहे.
जिल्ह्यातील वाढते रुग्णांचे प्रमाण लक्षात घेता कोरोनाची वाढती रुग्ण संख्येची साखळी तोडण्याकरीता जिल्ह्यातील सर्व कृषी उत्पन्न बाजार समिती बंद करण्याच्या आवश्यकतेबाबत जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण यांचे बैठकीमध्ये सांगोपांग चर्चा करण्यात आली व जिल्ह्यातील सर्व कृषी उत्पन्न बाजार समित्या या दि. 31 मे 2021 पर्यंत बंद ठेवणे आवश्यक असलेबाबत सर्व उपस्थित सदस्यांचे एकमत झाले.
या निर्णयानुसार जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणचे अध्यक्ष राजेंद्र भोसले यांनी साथरोग अधिनियम 1897 व आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 अन्वये मला प्रदान करण्यात आलेल्या अधिकाराचा वापर करुन कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा एक भाग म्हणून अहमदनगर जिल्ह्यामधील सर्व कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे सर्व व्यवहार हे दि.18/05/2021 रोजी रात्री 12.00 वाजेपासून ते दि. 31/05/2021 रात्री 12.00 वाजेपर्यंत बंद करण्याचे आदेश दिले आहेत.
तसेच शेतकर्यांना त्यांच्या मालाची विक्री करण्याच्या दृष्टीने पर्यायी व्यवस्था विकेंद्रित पध्दतीने उपलब्ध करुन देण्याची जबाबदारी संबंधित कृषी उत्पन्न बाजार समितीची राहील व समन्वयाची जबाबदारी जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, अहमदनगर यांची राहील, असे आदेशात म्हटले आहे.
याचे उल्लंघन करणार्यांवर साथरोग अधिनियम 1897 मधील तरतूदीनूसार भारतीय दंड संहिता (45 ऑफ 4860) च्या कलम 188 नुसार दंडनीय अथवा कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
IGbTZmExMPdrN