पाथर्डी । अनिल खाटेर 03-May, 2021, 12:00 AM
तहसीलदारांच्या सूचनेनुसार पाथर्डी पालिका प्रशासनाने शहराची नाकाबंदी केली आहे. शहरातील प्रमुख मार्गासह जास्त वर्दळीच्या रस्त्यांवर बांबू बांधून व काट्या टाकून रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहेत.
पालिका प्रशासन शहरातील कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी सज्ज झाले असून विनाकारण फिरणार्यांवर आता दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. यासाठी पालिका प्रशासन सर्व ताकदीनिशी रस्त्यावर उतरले आहे.
प्रांताधिकारी देवदत्त केकाण, तहसीलदार श्याम वाडकर, मुख्याधिकारी धनंजय कोळेकर यांनी तातडीची संयुक्त बैठक घेवून शहरातील गर्दी टाळण्यासाठी उपाययोजना करायला सुरुवात केली आहे. प्रतिबंध असलेले सर्व व्यवसाय सुरू आहेत. बाजारात गर्दीचा पूर वाढत आहे. सर्वसामान्य नागरिक वाढत्या गर्दीमुळे त्रस्त होऊन वाढती रुग्ण संख्या रोखणे प्रशासनाची परीक्षा पाहणारे ठरत आहे.
शहर व उपनगरांमध्ये स्वतंत्रपणे पथके तैनात करण्यात येऊन मोटरसायकलवर शहरभर फिरणारे पथक वेगळे असणार आहे.
दंडात्मक कारवाई प्रसंगी गुन्हा दाखल करण्याचे आदेश तहसीलदार व प्रांताधिकारी यांनी पालिका प्रशासनास दिल्याने सर्व कर्मचारी या मोहिमेसाठी वापरण्यात येणार आहेत. बॅरिगेटिंग काढणे, तोडणे याविरुद्ध गंभीर स्वरूपाची कारवाई केली जाणार आहे.
मुख्याधिकारी धनंजय कोळेकर व आय्युब सय्यद यांच्या मार्गदर्शनाखाली पालिकेच्या विविध विभागातील प्रमुखांनी शनी मंदिर, कसबा पेठ, उर्दु शाळा परिसर, नाथनगर मुख्य रस्ता बॅरीगेटिंग केले आहेत. उद्या सोमवारी सकाळी नऊ वाजल्यापासून सर्व पथके एकाच वेळी कार्यरत होतील. फळबाजार व भाजीबाजार एका ठिकाणी न बसवता अशा विक्रेत्यांना शहरभर फिरण्यास सकाळी अकरा वाजेपर्यंत परवानगी असेल. लवकरच रस्ते मोकळे करून वाहतुकीस योग्य केले जाईल.
राष्ट्रीय महामार्गासह, नवी पेठ, चिंचपूर रोड, बाजारतळ, उपनगरांमधील मुख्य रस्त्यावरील वाहतुकीस अडथळा ठरणारी अस्थायी अतिक्रमणे हटविली जाणार आहेत.
या बॅरीगेटिंग मोहिमेमध्ये गौरव आदिक, महेश कवादे, लक्ष्मण हाडके, दत्ता ढवळे, रशीद शेख, ज्ञानू सिंग परदेशी, जावेद शेख, बंडू फळे, सोमनाथ गर्जे, शिवा पवार आदी विभाग प्रमुख व कर्मचारी सहभागी झाले आहे.
रस्त्यावर व ओट्यावर विनाकारण बसणार्या विरुद्ध मुंबई पोलीस अधिनियमान्वये कारवाई करण्याचा निर्णय पाथर्डी पोलिसांनी घेतल्याचे सांगण्यात आले.
Comments