शेवगावात तीन पोलिस कर्मचार्यांवर हप्ता वसुलीप्रकरणी एसीबीची कारवाई
शेवगाव । वीरभूमी - 03-May, 2021, 12:00 AM
वाळुचा पकडलेला ट्रक सोडण्यासाठी व वाळू वाहतुकीसाठी ट्रक चालू देण्यासाठी हप्ता म्हणुन दि. 7 एप्रिल 2021 रोजी तक्रारदार यांच्याकडे 15 हजार रुपयाची लाच मागितल्याप्रकरणी शेवगाव उपविभागिय पोलिस अधिकारी यांच्या पथकातील तीन पोलिस कर्मचार्यांवर आज शेवगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकारामुळे पोलिसांची खाकी काळवंटली असून तब्बल 26 दिवसानंतर गुन्हा दाखल झाल्याने अखेर शेवगाव उपविभागिय कार्यालयातील कारनामे जनतेसमोर आले आहेत. गुन्हा दाखल झालेल्या पोलिसांची नावे वसंत कान्हु फुलमाळी, संदीप वसंत चव्हाण व कैलास नारायण पवार अशी असून हे तीघेही पाथर्डी येथील रहिवासी असून तक्रारदारही पाथर्डी येथील आहे.
याबाबत समजलेली हकीगत अशी की, शेवगाव पोलिस उपविभागिय अधिकारी सुदर्शन मुंढे यांच्या पथकातील पो. कॉ. वसंत कान्हु फुलमाळी (रा. शंकरनगर, पाथर्डी), पो. काँ. संदीप वसंत चव्हाण (रा. पाथर्डी, हल्ली रा. पोलिस वसाहत, शेवगाव) व पो. कॉ. कैलास नारायण पवार (रा. शंकरनगर, पाथर्डी) यांनी दि. 7 एप्रिल 2021 रोजी तक्रारदार यांचा वाळूचा ट्रक पकडला होता. पकडलेला वाळूचा ट्रक सोडण्यासाठी व यापुढे वाळू वाहतुकीसाठी ट्रक चालू देण्यासाठी हप्ता म्हणुन तक्रारदार यांच्याकडे 15 हजार रुपये लाचेची मागणी केली होती.
दरम्यान तक्रारदार यांच्याकडे 15 हजार रुपये लाच मागणी पडताळणी दरम्यान वरील तीनही लोकसेवकांनी लाच स्वीकारण्याची तयारी दर्शवल्यानंतर त्यांच्यावर लाचलुचपत प्रतिबंध पथकाने कारवाई करत शेवगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा दाखल झाला असून तीनही आरोपी फरार आहेत. त्यांचा शोध सुरू आहे.
ही कारवाई लाचलुचपतचे पोलिस अधीक्षक सुनील कडासने, अप्पर पोलिस अधीक्षक निलेश सोनवणे, पोलिस उपअधीक्षक विजय जाखव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरिक्षक श्याम पवरे, पोलिस उपविभागिय अधिकारी हरिष खेडकर यांच्या पथकाने केली.
दरम्यान शेवगाव उपविभागिय पोलिस अधीक्षक सुदर्शन मुंढे यांच्या पथकातील तीन कर्मचारी हप्ता वसुली प्रकरणात एसीबीच्या जाळ्यात अडकल्यानंतर शेवगाव पोलिस ठाण्यात वसुलीसाठी नेमलेल्या दोन कर्मचार्यांकडून वसुलीचे काम काढून घेऊन आता वसुलीची जबाबदारी इतर दोन पोलिस कर्मचार्यांकडे सोपावल्याची माहिती आहे.
याप्रकारामुळे पहिल्याला ठेच, दुसरा शहाणा याचा प्रत्यय आल्याचे पहायला मिळत आहे. एकाचवेळी लाचलुचपत पथकाने तीन पोलिस कर्मचार्यांवर गुन्हा दाखल केल्याची आतापर्यंतची ही मोठी कारवाई मानली जात आहे. यामुळे यापुढे आता कोणाचा नंबर लागतोय, अशू चर्चा आता सुरू झाली आहे.
QJxtaNpeSFwUPRCG