नगर शहरासह पाथर्डी व वाळकीत यशस्वी चाचणी
पाथर्डी । वीरभूमी - 08-Jan, 2021, 12:00 AM
करोना लस देण्याची सराव फेरी आज पाथर्डी येथील उपजिल्हा रुग्णालयात यशस्वीरीत्या पूर्ण झाली. चालू महिन्यात ही लस देण्यात येणार असल्याची शक्यता असल्याने आज ही सरावफेरी उपजिल्हा रुग्णालयाचे मुख्यवैद्यकीय अधिकारी डॉ. अशोक कराळे व जागतिक आरोग्य संघटनेचे तज्ञ् डॉ. चेतन खाडे यांच्या अधिपत्याखाली घेण्यात आली. ही लस कशा पद्धतीने द्यावी याचे प्रशिक्षण उपजिल्हा रुग्णालयातील पाच कर्मचाऱ्यांना या पूर्वीच देण्यात आले होते.
या बाबत अधिक माहिती अशी की, करोना ची लस कशा पद्धतीने द्यावी याची सरावफेरी आज देशातील ६३ जिल्ह्यांची निवड करण्यात आली होती. तर नगर जिल्ह्यात नगर शहर तर ग्रामीण भागात नगर तालुक्यातील वाळकी येथील प्राथमिक आरोग्य केंद्र व पाथर्डी येथील उपजिल्हा रग्णालयाची निवड करण्यात आली होती. कोरोना लस आल्यानंतर ती कशा पद्धतीने द्यायची याचे पूर्व प्रशिक्षण उपजिल्हा रुग्णालयातील राम गिरी, शीतल खंडागळे, आरती डोंगरे, सारिका तमखाने व मीना जगदाने या कर्मचाऱ्यांनी या पूर्वीच घेतले आहे.
आज डॉ. अशोक कराळे, डॉ. चेतन खाडे, डॉ. विनोद गर्जे, डॉ. सचिन चौधरी यांच्या उपस्थितीत उपजिल्हा रुग्णालयातील २५ अधिकारी व कर्मचाऱ्यांची त्या साठी चाचणी घेण्यात आली.
ही लस देण्यासाठी एकूण तीन वॉर्ड बनवण्यात आले असून एका वाॅर्ड मध्ये रुग्णांना योग्य अंतर राखून बसवण्यात येणार आहे. तर त्यानंतर दुसऱ्या वॉर्ड मध्ये प्रत्यक्षात रुग्णांना लस दिली जाणार आहे. यावेळी संबंधित रुग्णांची नोंद ही उपजिल्हा रुग्णालयात असलेल्या संगणकातील कोव्हीन अॅप वर आहे की नाही हे तपासले जाऊन नंतर ही लस दिली जाणार असून त्यानंतर तिसऱ्या वॉर्ड मध्ये रुग्णांना अर्धा तास बसवून नंतर सोडून दिले जाणार आहे.
या संदर्भात अधिक माहिती देताना डॉ. कराळे म्हणाले कि, ही लस उपलब्ध झाल्यानंतर सर्वात आधी हेल्थकेअर वर्कर्स, डॉक्टर, सिस्टर, वाॅर्डबॉय, सफाई कर्मचारी, सैनिक तसेच ५० पेक्षा जास्त वय असलेल्या मात्र ज्यांना रक्तदाब, शुगर असे आजार आहेत त्यांना ही लस दिली जाणार आहे. रुग्णाला जर लस दिल्या नंतर काही त्रास झाला तर उपचार करण्यासाठी आवश्यक असलेल्या सर्व सुविधा या ठिकाणी उपलब्ध आहेत.
Comments