भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष अशोक खेडकर यांचा राजीनामा
कर्जत । वीरभूमी - 08-Jan, 2021, 12:00 AM
कर्जत भाजपाचे माजी तालुकाध्यक्ष तथा विद्यमान जिल्हा उपाध्यक्ष आणि चापडगाव गटाचे जिल्हा परिषद सदस्य सौ. सुनीता खेडकर यांचे पती अशोक खेडकर यांनी आपल्या पदाचा राजीनामा भाजपाचे जिल्हाध्यक्ष अरुण मुंढे यांच्याकडे पाठविला असून यापुढे आपण फक्त भाजपाचे सामान्य सदस्य राहणार असल्याचे पत्रकार परिषदेत म्हंटले आहे.
ऐन ग्रामपंचायत निवडणुकीच्या तोंडावर अशोक खेडकर यांनी दिलेला राजीनामा राजकीय वर्तुळात खळबळ उडविणारा ठरणार आहे.
भाजपाचे विद्यमान जिल्हा उपाध्यक्ष तथा अपराजीत तालुकाध्यक्ष म्हणून ज्यांची कर्जत तालुक्यात ओळख असणारे अशोक खेडकर यांनी आपल्या जिल्हा उपाध्यक्षपदाचा राजीनामा भाजपाचे जिल्हाध्यक्ष अरुण मुंढे यांच्याकडे पाठविला असल्याचे पत्रकार परिषदेत म्हंटले. आपण पक्षातील कोणत्याही नेत्यावर अथवा व्यक्तीवर नाराज नाही. अनेक वर्षांपासून पक्षात वावरत असताना कुटुंबाकडे दुर्लक्ष होत आहे त्यांची नैतिक जबाबदारी आपल्यावर असल्याने पक्षासाठी वेळ देणे सध्याच्या काळात जमत नसल्याच्या कारणाने आपण आपल्या जिल्हा उपाध्यक्ष पदाचा राजीनामा वरिष्ठांकडे पाठविला असल्याचे स्पष्ट केले. मात्र आपण भाजपातच राहणार आहोत अशी स्पष्टोक्ती देखील खेडकर यांनी पत्रकार परिषदेत केली. त्यामुळे कोणी आपल्या राजीनाम्याचा गैरअर्थ काढू नये असे सांगितले.
यापुढे आपण केवळ भाजपात सर्वसामान्य सदस्य म्हणून जबाबदारी पाळणार असल्याचे म्हंटले. सध्या कर्जत तालुक्यातील ५६ ग्रामपंचायतीची निवडणूक तोंडावर उभी ठाकली असून अशोक खेडकर यांच्या राजीनाम्याने कर्जतच्या राजकीय वर्तुळात मात्र चांगलीच खळबळ उडाली आहे.
GbanpPQTte