अहमदनगर- औरंगाबाद रेल्वे मार्गाचा होणार सर्व्हे
अहमदनगर । वीरभूमी - 28-Feb, 2021, 12:00 AM
अहमदनगर व औरंगाबाद जिल्ह्यातील औद्योगिक विकासाला उपयुक्त ठरणार्या अहमदनगर-औरंगाबाद रेल्वेमार्गाच्या सर्वेक्षणास मंगळवारपासून सुरुवात होत आहे. या सर्व्हेसाठी मध्य रेल्वे मुंबईचे पथक दाखल होणार आहे. हा रेल्वे मार्ग अहमदनगर शनिशिंगणापूर, नेवासा, औरंगाबाद असा जाणार असल्याने औद्योगिकीकरणाबरोबरच तिर्थक्षेत्रांचाही विकास होण्यास मदत होणार आहे.
याबाबतच्या सर्व्हेसाठी मध्य रेल्वेचे हे पथक तीन दिवसांत अहमदनगर व औरंगाबाद जिल्हा तसेच मार्गावरील संभाव्य तालुक्यांचा आढावा घेणार आहे. पथक अहमदनगर, नेवासा तसेच शनिशिंगणापूर येथे जावून शनिशिंगणापूर येथील भाविकांशीही चर्चा करणार आहे. केंद्रीय रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांना मराठवाड्यातील रखडलेल्या प्रकल्पांसंबंधी माहिती देऊन गती देण्यासाठी पाठपुरावा केला जाणार असल्याची माहिती रावसाहेब दानवे यांनी दिली आहे.
या रेल्वे मार्गामुळे अहमदनगर जिल्ह्यातील औद्योगिकरणासह शनिशिंगणापूर, नेवासा, देवगड, प्रवरासंगम येथील तिर्थक्षेत्रांच्या विकासाबरोबरच जालना, शेंद्रा, चिकलठाणा, औरंगाबाद रेल्वे स्टेशन, वाळूंज, सुपा, पुणे औद्योगिक वसाहती जोडल्या जाणार आहेत. यातून लाखो जणांना रोजगार मिळणार आहे.
अहमदनगर - औरंगाबाद रेल्वे मार्गाबरोबरच अहमदनगर - पुणे या रेल्वे मार्गामुळे पुणे ते औरंगाबाद हे अंतर चार तासाचे असणार आहे. या सर्व्हेसाठीही केंद्राकडे पत्र पाठविले असून शंभर वर्षांपासून लालफितीत अडकलेल्या जालना - खामगाव रेल्वे मार्ग सर्वेक्षणाचेही आदेश निघाले आहेत.
सध्या औरंगाबादेतून पुण्याला जाण्यासाठी रेल्वे आधी मनमाडला जाऊन परत मागे वळते. त्यात सात तास खर्ची पडतात. नवीन मार्ग अंमलात आला तर चार तासात पुणे गाठता येईल, असे रावसाहेब दानवे यांनी सांगितले.
fRYSzgnTO