ज्येष्ठ नागरिकांसह 45 वर्षांवरील आजारी लोकांना लस, खासगी केंद्रांवर 250 रुपयांत डोस
नवी दिल्ली । वीरभूमी - 28-Feb, 2021, 12:00 AM
देशात 1 मार्चपासून कोरोना लसीकरणाचा दुसरा टप्पा सुरू होत आहे. यात 60 वर्षांवरील सुमारे 10 कोटी ज्येष्ठ नागरिकांना तसेच 45 वर्षांवरील गंभीर आजार असलेल्या लोकांना लस दिली जाणार आहे. सरकारी रुग्णालयांत मोफत लस दिली जाणार आहे. खासगी रुग्णालयांत लसीचा एक डोस घेण्यासाठी 250 रुपये द्यावे लागतील. म्हणजेच, दोन डोससाठी 500 रुपये खर्च येईल.
एम्पॉवर्ड ग्रुप ऑफ व्हॅक्सिन अॅडमिनिस्ट्रेशन फॉर कोविड-19 चे मुख्य कार्यकारी अधिकारी आर. एस. शर्मा म्हणाले, खासगी रुग्णालयांत प्रत्येक डोसमागे 100 रुपये सेवा शुल्क आणि 150 रुपये लसीसाठी घेतले जातील. सरकार एक डोस 150 रुपयांना देत आहे. नोंदणीसाठी कोविन-2.0 अॅप रविवारी किंवा सोमवारी लाँच होईल. यानतंर लाभार्थी नोंदणी करू शकतील.
कोरोना रुग्णांची संख्या महाराष्ट्रासह सहा राज्यांत वाढत असून पुण्यात गेल्या 8 दिवसांत 1 हजार नवे रुग्ण आढळले. विदर्भातील पाच जिल्ह्यांत परिस्थिती बिकट होत चालली आहे. राज्यात शनिवारी एकूण 8,333 रुग्ण आढळले. त्यामुळे हा नवा संसर्ग रोखण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
अॅपवर आपण जवळील केंद्राची निवड करू शकाल. सर्व सरकारी रुग्णालये, आरोग्य केंद्रांशिवाय आयुष्मान भारतशी संबंधित 11 हजार रुग्णालये किंवा केंद्रीय सरकारी आरोग्य योजना रुग्णालये (सीजीएचएस) लस घेण्यासाठी निवडता येतील. ज्या राज्यांत आयुष्मान योजना लागू नाही, अशी राज्ये खासगी रुग्णालये निश्चित करतील. स्टेट हेल्थ इन्शुरन्स योजनेत नोंदणीकृत रुग्णालयांतही लस घेता येणार आहे.
पहिल्या डोसनंतर 28 दिवसांनी दुसरा घेता येईल. यानंतर 14 दिवसांनी प्रतिकारक्षमता विकसित होईल. मास्क वापरा, फिजिकल डिस्टन्सिंग पाळा.
jvDSBoqGYaIVfQ