मढेवडगाव येथील घटना । शेतकर्यांचे 35 हजार रुपयाचे नुकसान
श्रीगोंदा । वीरभूमी - 29-Oct, 2020, 12:00 AM
तालुक्यातील मढेवडगाव येथील देवमळा वस्तीवर बुधवार दि. 28 रोजी मध्यरात्रीच्या सुमारास लांडग्यांच्या टोळीने बांधलेल्या शेळ्यांवर हल्ला करून दोन शेळ्या जाग्यावर फस्त केल्या. एक शेळी मारून टाकली तर एक बोकड लंपास केला. या हल्ल्यात चार शेतकर्यांचे सुमारे 35 हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, दि. 28 व दि. 29 च्या मध्यरात्री दरम्यान अंदाजे सहा ते सात लांडग्यांनी मढेवडगाव येथील वनविभागाच्या जंगला नजीक असलेल्या देवमळा (मांडे वस्ती) वर मोर्चा वळवला व दारात बांधलेल्या शेळ्यांवर हल्ला केला. या हल्ल्यात लांडग्यांनी दोन शेळ्या जाग्यावरच खाऊन फस्त केल्या.
एक शेळी मारून टाकली तर एका बोकडाचा काही भाग सोडता बोकड घेऊन पोबारा केला. मारुती रंगनाथ मांडे, महादेव गंगाराम कांबळे, नाना नातू कांबळे व सोपान किसन मांडे यांची प्रत्येकी एक शेळी यात बळी पडली. एकूण 35 हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. ग्रामस्थांनी वनविभागाला कळविल्यावर वनपाल मच्छिंद्र गुंजाळ व वनरक्षक नितीन डफडे यांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी करत पंचनामा केला.
Comments