गुरुवारी सायंकाळी 7.30 वाजता शिरापूर येथून पाच वर्षाच्या मुलाला बिबट्याने उचलले
पाथर्डी । वीरभूमी - 29-Oct, 2020, 12:00 AM
पाथर्डी तालुक्यातील मढी, केळवंडी नंतर आता शिरापूर येथील डोंगराच्या पायथ्याला राहणार्या संजय मुरलीधर बुधवंत यांच्या पाच वर्षाच्या मुलाला बिबट्याने उचलून नेल्याची घटना गुरुवारी सायंकाळी 7.30 वाजेच्या दरम्यान घडली. या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून वनविभागाच्या कारभाराबाबत तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
पाथर्डी तालुक्यातील गर्भगिरी डोंगर रांगाच्या परिसरात मढी, वृद्धेश्वर, शिरापूर, केळवंडी, माणिकदौंडी आदी परिसरात बिबट्याने चांगलीच दहशत निर्माण केली आहे. मागील आठवड्यात मढी येथून एक व त्यानंतर केळवंडी येथून एक असे दोन बालकांना बिबट्याने उचलून नेहुन ठार केल्याच्या घटना घडल्या आहेत.
त्यानंतर आज गुरुवारी सायंकाळी 7.30 वाजण्याच्या सुमारास शिरापूर गाव हद्दीतील डोंगराच्या पायथ्याला राहणार्या संजय मुरलीधर बुधवंत यांची पत्नी आपल्या पाच वर्षाच्या मुलाला घेवून पडवीत बसली होती. त्याच दरम्यान बिबट्याने झेप घेवून आईच्या मांडीवर असलेल्या पाच वर्षाच्या मुलाला उचलून नेले.
अवपल्या डोळ्यासमक्ष मुलाला बिबट्या घेवून जात असल्याचे पाहुन आईने बिबट्याला झुंज दिली. मुलाला पकडतांना बिबट्याची शेपटीच हातात आली. तरीही बिबट्याने झटका देऊन बाळाला घेवून पळून जाण्यात यशस्वी झाला.
या घटनेची माहिती कळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत शोधाशोध सुरू केली आहे. वनविभागाचे कर्मचारीही घटनास्थळी दाखल झाले असून शोध सुरू आहे. मात्र वनविभागाचे कर्मचारी व त्यांच्या उपाय योजना कमी पडत असल्याने बिबट्याला पकडण्यात अपयश येत आहे. यामुळे नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
kYcTUxSMfIyu