आघाडी सरकारकडे बहुमत नसल्याचा केला दावा
मुंबई । वीरभूमी - 28-Jun, 2022, 11:06 PM
मागील काही दिवसापासून शिवसेनेच्या आमदारांनी बंडखोरी करत काँग्रेस, राष्ट्रवादीबरोबर सरकाराचा पाठिंबा काढण्याची मागणी करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविरोधात बंडखोरी केली आहे. हे बंडखोर सध्या गुवाहाटीत असून त्यांची संख्या 39 च्या घरात आहे.
या सर्व प्रकारामुळे राज्यातील आघाडी सरकार अल्पमतात असून लोकप्रतिधीसह सर्व सामान्य नागरिक अडचणीत असून कायदा व सुव्यवस्था निर्माण झाली असल्याचे सांगत भाजपाच्या शिष्टमंडळाने राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेत आघाडी सरकारला बहुमत नसल्याचा दावा केला आहे.
या शिष्टमंडळात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील, आ. प्रवीण दरेकर, सुधीर मुनगंटीवार, आ. आशिष शेलार आदी भाजपा नेते उपस्थित होते.
राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेतल्यानंतर देवेंद्र फडणवीस पत्रकारांशी बोलतांना म्हणाले की, मुख्यमंत्री आणि सरकारजवळ बहुमत राहिलं नाही, काँग्रेस राष्ट्रवादीसोबत राहायचं नाही असा शिवसेना आमदारांचा पवित्रा आहे, अशा परिस्थितीत ठाकरे सरकारला बहुमत सिद्ध करण्यास सांगावं, असं विनंती करणारं पत्र राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना दिले आहे. हे पत्र ई-मेलद्वारे व प्रत्यक्ष भेटून दिले असल्याचे फडणवीस यांनी सांगितले.
राज्यपाल यांना दिलेल्या पत्रात राज्याची आत्ताची परिस्थिती मांडण्यात आली आहे. शिवसेनेचे 39 आमदार हे राष्ट्रवादी- काँग्रेस सोबत राहायचं नाही, असा पवित्रा त्यांनी घेतलेला आहे. याचा साधा अर्थ आहे, ते 39 आमदार सरकारसोबत नाहीत. त्यामुळे सरकारजवळ बहुमत राहिलेलं नाहीय. सरकारला बहुमत सिद्ध करायला लावावं, यासाठीचं पत्र राज्यपालांना दिले असल्याची माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
राज्यपाल यांना दिलेल्या पत्रात सर्वोच्च न्यायालयाच्या विविध निर्णयांचा उल्लेख करण्यात आलेला आहे. भाजपा शिष्टमंडळाने दिलेल्या पत्राचा योग्य तो निर्णय राज्यपाल घेतील आणि आघाडी सरकारला बहुमत सिद्ध करण्याबाबत सुचना करतील, अशी अपेक्षाही देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली आहे.
kGSpynJPBauc