मोठे चिरंजीव विक्रमसिंह यांच्यावर तालुका व राज्याची तर धाकट्या प्रतापसिंह यांना स्थानिक राजकारणाची जबाबदारी
विजय उंडे । वीरभूमी - 29-Jun, 2022, 09:48 AM
श्रीगोंदा : आमदार बबनराव पाचपुते यांचे राजकरण संपले अशी टिंगलटवाळी करणार्यांना त्यांनी धोबीपछाड देण्याचे ठरवले आहे. मोठे चिरंजीव विक्रमसिंह यांची भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाच्या प्रदेश उपाध्यक्षपदी वर्णी लागली असून यातून ते राजकारणात सक्रिय होण्याचे संकेत मिळत आहेत. दुसरे चिरंजीव प्रतापसिंह यांना गावच्या सोसायटीत चेअरमन करून त्यांच्यावर स्थानिक राजकारणाची जबाबदारी टाकली आहे.
आमदार बबनराव पाचपुते हे एक राज्य पातळीवरचे नेतृत्व म्हणुन गणले गेले आहे. राज्यात जे चार पाच जेष्ठ नेते आहेत ज्यांची संसदीय कारकीर्द मोठी आहे. त्यात पाचपुते यांचे वरचे स्थान आहे. पाचपुते या नावाचा त्यांनी राज्यभर दबदबा निर्माण केला. मध्यंतरी ते आजारी पडले. त्यांच्या अजाराबाबत तालुक्यातून वेगवेगळ्या अफवा पसरवल्या गेल्या.
आमदार पाचपुते हे सध्या माऊलीच्या पायी दिंडीत सहभागी झाले आहेत. घशाला दुखापत झाल्याने त्यांना बोलताना त्रास होत होता. मात्र त्यातून सहिसलामत ते बाहेर पडले असून दिंडीत ठिकठिकाणी प्रवचने देत आहेत. आमदार पाचपुते यांची चेष्टा करणार्यांची कोल्हेकुई बंद करण्याचा त्यांनी जणू विडाच उचलला आहे. मागील आठवड्यात आपण पूर्णपणे तंदुरुस्त झाल्याचे सांगत त्यांच्या विरोधकांना एकप्रकारे इशारा दिला आहे.
राज्यात भारतीय जनता पार्टीचे सरकार येण्यास थोडा अवधी राहिला आहे. पाचपुते यांच्या अंगी यामुळे दुप्पट बळ संचारले आहे. आमदार पाचपुते यांनी तालुक्याच्या राजकारणाचा भविष्याचा वेध घेत आपल्या दोन्ही सुपुत्रांना राजकिय रणांगणात उतरवले आहे.
त्यांचे थोरले चिरंजीव विक्रमसिंह हे त्यांच्या खाजगी साखर कारखान्याच्या अडचणी वाढल्यानंतर काही दिवस राजकीय दृष्ट्या अज्ञातवासात गेले होते. यावर्षीचा साखर कारखान्याचा गळीत हंगाम त्यांनी यशस्वी करून दाखविला. यामुळे त्यांची राजकीय एंट्री अनेक अर्थाने वेगळी ठरणार आहे. भाजपच्या युवा प्रदेश उपाध्यक्षपदी त्यांची नियुक्ती झाली आहे.
भारतीय जनता पार्टीमध्ये पक्षीय राजकारणाला अनन्य साधारण महत्त्व असते. पक्षीय राजकारणात त्यांचा दबदबा वाढलानंतर सत्तास्थाने त्यांच्या पायाशी लोळण घेणार आहेत.
आमदार पाचपुते यांचे दुसरे चिरंजीव प्रतापसिंह यांच्याकडे गेल्या अनेक वर्षापासून परिक्रमा शिक्षण संस्थेची जबाबदारी आहे. परिक्रमामध्ये त्यांनी यशस्वी वाटचाल करून दाखवली आहे. अलीकडच्या काळात आमदार पाचपुते यांची स्थानिक राजकारणात हेळसांड झाली. स्थानिक राजकारणाचा दुवा म्हणून प्रतापसिंह यांच्या खांद्यावर जबाबदारी टाकत तालुक्याच्या राजकारणात त्यांना सक्रिय केले आहे.
‘नडले’ ते राजकीय दृष्ट्या ‘पायदळी’ तुडवले जाणार
आमदार बबनराव पाचपुते यांना त्यांच्या पडत्या काळात अनेकांनी त्रास दिला. अनेक कार्यकर्त्यांनी संधीसाधूपणाचा फायदा घेत विरोधकांशी आतून संगनमत केले. आमदार पाचपुते यांना खिंडीत पकडण्यासाठी त्यांच्या आजारपणाचा अनेकांनी गैरफायदा घेतला. आमदार पाचपुते यांनी त्यांच्या राजकीय आयुष्यात कधीच काही बोलून दाखवले नाही मात्र कृतीत माघार घेतल्याचे ऐकिवात नाही. आमदार पाचपुते या दोन सिंहाच्या माध्यमातुन या सत्तालंपट कार्यकर्त्यांना राजकीय दृष्ट्या पायदळी तुडवल्यास नवल वाटायला नको?
CcXYOiJvwMeSqnE