शेवगाव । वीरभूमी - 19-Jun, 2022, 07:35 PM
शेवगाव तालुक्यातील कर्हेटाकळी येथील यशवंत उपसा जलसिंचन सहकारी संस्थेने जायकवाडी धरणातून सिमेंट पाईप टाकून शेतीसाठी पाणी आणले होते. मात्र ही पाईप लाईन सुमारे पाच वर्षापासून बंद आहे. या पाईपलाईनचे 24 सिमेंट पाईप दोन जेसीबी व एका ट्रक्टरच्या साह्याने चोरुन घेऊन जाणार्या दोघांना तब्बल 15 लाख रुपयाच्या मुद्देमालासह शेवगाव पोलिसांनी जेरबंद केले आहे.
अटक केलेल्या आरोपीमध्ये अलिम हसन शेख (रा. कर्हेटाकळी) व वैभव ज्ञानेश्वर जाधव (रा. दहिगावने) अशी असून या टोळीतील पसार असलेल्या तीघांचा पोलिस शोध घेत आहेत.
याबाबत समजलेली माहिती अशी की, कर्हेटाकळी येथील यशवंत उपसा जलसिंचन सहकारी संस्थेने जायकवाडी धरणातून सिमेंट पाईपच्या साह्याने शेतीसाठी पाणी आणले होते. या पाईपलाईनसाठी तब्बल एक हजार सिमेंटचे पाईप जमिनीखाली पुरुन त्यातून शेतीसाठी पाणी वाटप सुरू होते.
मात्र मागील पाच वर्षापासून ही पाईपलाईन बंद होती. याचाच फायदा घेवून आरोपी आकाश राजू पवार, अलिम हसन शेख, विष्णू भानुदास राठोड, राजू बाबुलाल चव्हाण (सर्व रा. कर्हेटाकळी) आणि वैभव ज्ञानेश्वर जाधव (रा. दहिगावने) यांनी संगणमताने कर्हेटाकळी गावचे शिवारात गट नं. 34 मधून जमिणीखालून जाणार्या पाईपलाईन मधील तब्बल 24 सिमेंटचे पाईपदोन जेसीबी व एका ट्रक्टरच्या साह्याने उकरुन ते चोरुन नेले.
याबाबत कर्हेटाकळी सेवा सोसायटीचे चेअरमन लक्ष्मण पंडीत गायके यांनी शेवगाव पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती. या फिर्यादीवरुन वरील पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता.
गुन्हा दाखल झाल्यानंतर शेवगाव पोलिस ठाण्याचे पोनि. विलास पुजारी यांनी सपोनि. आशिष शेळके, सपोनि. विश्वास पावरा, सपोनि. रविंद्र बागुल यांनी सदरील आरोपीच्या शोधासाठी पथके तयार करुन शोध घेण्याच्या सुचना केल्या. या सुचनेवरुन तात्काळ दोन पथके तयार करुन आरोपींच्या शोधासाठी रवाना झाले.
सदरच्या गुन्ह्यातील चोरी करणारे आरोपी अलिम हसन शेख व वैभव ज्ञानेश्वर जाधव हे दोघे मुद्देमालासह पोलिसांना आढळून आले. या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेत त्यांच्याकडून 1 लाख 32 हजार रुपये किंमतीचे 11 सिमेंटचे पाईप, 10 लाख रुपये किंमतीचा गुन्ह्यात वापरलेला जेसीबी, 3 लाख 68 हजार रुपये किंमतीचा ट्रक्टरसह ट्रॉली असा एकुण 15 लाख रुपये किंमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.
ही कारवाई पोलिस अधीक्षक मनोज पाटील, अप्पर पोलिस अधिक्षक सौरभकुमार अग्रवाल, उपविभागिय पोलिस अधिकारी सुदर्शन मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली पोनि. विलास पुजारी, सपोनि. आशिष शेळके, विश्वास पावरा, रविंद्र बागुल, स.फौ. बाळासाहेब ताके, पोहेकॉ. प्रशांत नाकाडे, पोना. अभयसिंह लबडे, पोना. अशोक लिपणे, पोना. सुखदेव धोत्रे, पोकॉ. संपत खेडकर, पोकॉ. सुनील रत्नपारखी, पोकॉ. महेश सावंत, पोकॉ. समीर फकीर, मपोकॉ. रुपाली कलोर यांनी केली.
उर्वरित पसार असलेल्या तीन आरोपींचा शोध पोलिस घेत आहेत. पुढील तपास पोना. अभयसिंह लबडे हे करीत आहेत.
icaRQJoOAH