पाथर्डी । वीरभूमी - 19-Jun, 2022, 03:44 PM
तालुक्यातील देवराई सेवा संस्थेच्या निवडणूक निकालानंतर दोन गटात राडा होवून झालेल्या मारहाणीत एकचा खून झाला. याप्रकरणी पाथर्डी पोलिस ठाण्यात दाखल फिर्यादीतील 10 आरोपींना 12 तासाच्या आत पकडण्यात पोलिसांना यश आले आहे.
याबाबत समजलेली माहिती अशी की, पाथर्डी तालुक्यातील देवराई सेवा सोसायटी निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर विजयी पॅनल श्री. बालाजी शेतकरी विकास मंडळाच्यावतीने साउंड सिस्टिम लावून विजयी मिरवणूक काढण्यात आली होती. मिरवणूक चालू असतांना निवडणुकीतील पराभूत झाल्याच्या कारणावरुन पूर्वतयारीने अचानकपणे तलवार, सुरा, लोखंडी कुर्हाड, लाकडी दांडके, काठ्या घेवून झालेल्या मारहाणीत अजय गोरक्ष पालवे याचा खून झाला तर इतर लोक गंभीर जखमी झाले.
याप्रकरणी बाळासाहेब नवनाथ पालवे (वय 40 वर्षे) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून भादंवी कलम 302, 324, 323, 337, 143, 147, 149, 120 (ब), सह आर्म अॅक्ट नुसार 15 ते 20 जणांवर पाथर्डी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मारहाणीच्या घटनेनंतर देवराई परिसरात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला होता.
तसेच तेथील ग्रामस्थांनी अहमदनगर ते तिसगाव राष्ट्रीय महामार्गावर रास्तारोको आंदोलनही केले होते. या तणावाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी निर्माण झालेली परिस्थिती कौशल्याने हाताळत रस्ता पुन्हा वाहतुकीसाठी खुला करुन दिला.
घटना घडल्यानंतर पोलिसांनी सांघिक कारवाई करत 12 तासाच्या आत 10 आरोपींना शिताफिने अटक केली. या गुन्ह्यातील सुनील एकनाथ पालवे, संतोष रामदास पालवे, अंबादास सदाशिव पालवे यांना पाथर्डी पोलिसांनी अटक केली. तर इतर आरोपी हे फॉर्च्युनर गाडी (क्र. एमएच 16, बीझेड 3131) ने तिसगाव येथून मिरी, माका, देडगाव, कुकाणा, नेवासा या मार्गाने पळून जातांना उपविभागिय पोलिस अधिकारी सुदर्शन मुंडे यांनी पथकासोबत आणि पाथर्डीचे पोनि. सुहास चव्हाण यांनी पथकाने फॉर्च्युनर गाडीचा दीड ते दोन तास थरारक पाठलाग करत असतांना नेवासा पोलिसांनी नाकाबंदी दरम्यान ताब्यात घेतले.
सदर फॉर्च्युनर गाडीमधून पोलिसांनी संजय विष्णू कारखेले, आकाश संजय पालवे, सविता अनिल पालवे, अनिल एकनाथ पालवे, दिनकर सावळेराम पालवे यांना ताब्यात घेतले. तसेच स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अक्षय संभाजी पालवे यास ताब्यात घेतले.
सदरची कारवाई पोलिस अधीक्षक मनोज पाटील, अपर पोलिस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल, उपविभागीय पोलिस अधिकारी सुदर्शन मुंढे यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली पाथर्डीचे पोनि. सुहास चव्हाण, सपोनि. कायंदे, सपोनि. वाघ, पोउपनि. डांगे, गोपनियतेचे भगवान सानप, पोना. अनिल बडे, पोना. नवगीरे, पोहेकॉ. चव्हाण, पोना. इश्वर गर्जे, सफौ. कराड, चालक किशोर पालवे तसेच नेवासाचे पोनि. करे, पोना. राहुल यादव, पोहेकॉ. तोडमल, पोकॉ. गुंजाळ, पोकॉ. गलधर, पोकॉ. म्हस्के यांच्यासह
शेवगावचे पोनि. निलास पुजारी व त्यांचे पथक, सोनई पोलिस ठाण्याचे सपोनि. चौधरी व त्यांचे पथक, शनिशिंगणापूरचे सपोनि. कर्पे व त्यांचे पथक तसेच स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ही कारवाई केली.
SExrWAVJjvlaKumR