विजय उंडे । वीरभूमी - 19-Jun, 2022, 02:23 PM
श्रीगोंदा : श्रीगोंदा तालुक्यातील अण्णासाहेब शेलार, बाळासाहेब नाहाटा, दत्तात्रय पानसरे, केशवराव मगर, बाळासाहेब गिरमकर, राजेंद्र मस्के यांनी त्यांच्या गावात सवतेसुभे केलेत. त्यांच्या गडाला हादरे देण्यासाठी बाह्यशक्तींनी प्रचंड मदत केली. या नेत्यांनी या बाह्यशक्तीला धोबीपछाड देऊन स्वतःचे अस्तित्व कायम ठेवले. भविष्यात या नेत्यांचा सामना करताना तालुक्यातील राजकारणात काही नेत्यांच्या अडचणीत वाढ होणार आहे.
केशवराव मगर, बाळासाहेब गिरमकर वगळता ही सर्व नेतेमंडळी आमदार बबनराव पाचपुते यांच्या तालमीत तयार झाली. महत्त्वकांक्षा असलेल्या या नेत्यांनी आपापल्या गावात स्वतःचे सवतेसुभे निर्माण केले. गावच्या राजकारणातून या नेत्यांना सोसायटीच्या निवडणुकीच्या निमित्ताने हद्दपार करायचे असा चंग तालुक्यातील नेत्यांनी बांधला. मात्र या नेत्यांनी गावच्या सोसायटी निवडणुकांत दरवेळीपेक्षा सरस कामगिरी करत घवघवीत यश प्राप्त केले. करायला गेले एक आणि झाले भलतेच अशी गत नेतेमंडळींची झाली आहे.
सहकार महर्षी काष्टी सोसायटीत सत्तांतर झाले हा कित्ता तालुकाभर गिरवता येईल या हेतूने प्रेरित होऊन विरोधकांवर जाळे फेकण्यास सुरुवात केली. तालुक्यातील नेत्यांनी आपली स्वतंत्र यंत्रणा ‘खास’ कामाला लावली. या नेत्यांचे सर्वाधिक टार्गेट अण्णासाहेब शेलार, बाळासाहेब नाहाटा व केशवराव मगर हे होते.
अण्णासाहेब शेलार यांच्या गावात सोसायटी निवडणुकीत सर्वाधिक तीन हजारांच्या आसपास सभासद आहेत. श्री. शेलार यांच्या विरोधात पद्धतशीरपणे पेरणी केली. अण्णासाहेब शेलार यांच्या विरोधात जे षडयंत्र चालले होते. त्याबाबत ते ज्या समाजातून आले त्या समाजातील तालुकाभरातील कार्यकर्त्यांच्यात असंतोष निर्माण झाला. बेलवंडी मधील भैरवनाथ सोसायटीत दुरान्वये संबंध नसलेले अण्णासाहेबांच्या समाजातील तालुक्यातील गावोगावचे कार्यकर्ते यांनी पाहुण्या- रावळ्यात येऊन त्यांना मनवले. अण्णासाहेब शेलार यांनी एक हजारापेक्षा जास्त मताधिक्य घेऊन विरोधकांना चारी मुंड्या चीत केले.
बाळासाहेब नाहाटा यांच्या गावात तर जातीवादाचा प्रचंड कळस झाला. बाळासाहेब नाहाटा यांना जातीच्या प्रमाणावर अव्हेन्यात आले. गावासाठी आयुष्यपणाला लावलेल्या बाळासाहेबांना वंचित घटकांनी साथ दिली. बाळासाहेब नाहाटा यांचा पाडाव करण्यासाठी लोणी व्यंकनाथ गावात तालुका काँग्रेसचे अध्यक्षपद दिले मात्र त्यांचा बार फुसका ठरला. बाळासाहेब नाहाटा यांचे निर्भेळ यश तालुक्याच्या राजकारणात त्यांचे वजन वाढविणारे ठरणार आहे.
नदीपट्टयात केशवराव मगर व बाळासाहेब गिरमकर यांना खिंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. परंतू ते कधी निसटले याचा थांगपत्ता त्यांच्या विरोधकांना लागलाच नाही.
‘गाडले’ पण ते बहुचर्चित ठरले
सहकार महर्षी नागवडे कारखान्याच्या निवडणूक निकालावेळी राजेंद्र नागवडे यांनी नाहाटांना ‘गाडले’ असा उल्लेख केला. त्याची व्हिडीओ क्लिप तालुका व तालुक्याबाहेर फिरली. त्याचा वचपा काढत बाळासाहेब नाहाटा यांनी राजेंद्र नागवडे यांचा पॅनल ‘गाडला’ अशी घोषणा मिरवणुकीत दिली. त्याचा व्हायरल व्हिडीओ सध्या तालुकाभर फिरत आहे. ‘गाडले’ या शब्दाला श्रीगोंद्याच्या राजकारणात बहुचर्चित आणले आहे.
lNArZQId