देवराई सोसायटी निवडणुकीनंतर दोन गट भिडले । तलवारीने वार; तीन जखमी एक ठार
पाथर्डी । वीरभूमी - 18-Jun, 2022, 11:08 PM
सध्या सोसायटी निवडणुकीचा धुराळा प्रत्येक गावात उडत आहे. मात्र पाथर्डी तालुक्यातील देवराई सेवा सोसायटी निवडणुकीच्या निकालानंतर दोन गट काठ्या तलवारी घेऊन भिडले. या वादात तलवारीने झालेल्या हल्ल्यात चार जण गंभिर जखमी झाले.
जखमींपैकी एकाचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला. सोसायटी निवडणुकीच्या विजयाचा गुलाल रक्ताने माखल्याने तालुक्यासह जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.
याबाबत समजलेली माहिती अशी की, पाथर्डी तालुक्यातील देवराई सेवा सोसायटीसाठी आज शनिवारी मतदान झाले. मतदानानंतर मतमोजणी होवून सत्ताधारी गटाला 11 तर विरोधकांना दोन जागांवर विजय मिळाला.
सोसायटीच्या निकालानंतर विजयी गटाने गुलालाची उधळण करत मिरवणूक काढली. यावरून दोन्ही गट एकमेकांना भिडले. या वादात तलवारीने हल्ला झाल्याने चार जण जखमी झाले.
या जखमीपैकी एकाचा उपचार दरम्यान मृत्यू झाल्याने गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले. या घटनेतील आरोपींना तात्काळ अटक करावी, या मागणीसाठी ग्रामस्थांनी रस्त्यावर उतरून रास्तारोको आंदोलन केले.
घटनेची माहिती कळताच पाथर्डी व शेवगाव पोलिस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी दाखल झाले. पोलिसांनी तात्काळ आरोपींच्या अटकेसाठी पथक रवाना केल्याने ग्रामस्थ शांत झाले.
तलवारीने झालेल्या मारामारीत देवराई येथील अजय गोरख पालवे, विष्णू कैलास पालवे, मनोहर नवनाथ पालवे, वैभव कैलास पालवे, सुमन नवनाथ पालवे यांचा समावेश असून यातील अजय पालवे याचा उपचारा दरम्यान मृत्यू झाल्याची माहिती समजली आहे.
पोलिस आरोपींच्या शोधासाठी रवाना झाले असून जखमींवर उपचार सुरु आहेत. या घटनेने पाथर्डी तालुक्यासह जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.
Comments