अहमदनगर । वीरभूमी - 17-May, 2021, 12:00 AM
जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या आज घटली असून नगरकरांना दिलासा मिळाला आहे. आज सोमवारी जिल्ह्यात 2105 कोरोना बाधित आढळले आहेत. घटलेल्या आकडेवारीतून कडक लॉकडाऊनचा परिणाम जाणवू लागल्याची बाब समोर आली आहे.
जिल्ह्यातील कोरोना बाधितांच्या आकड्यामध्ये दोन दिवस घट तर दोन दिवस वाढ झाल्यानंतर आज चौथ्या दिवशीही आकडेवारीत पुन्हा घट झाली आहे. रविवारच्या तुलनेत आज तब्बल 777 ने घट झाल्याने समाधान व्यक्त होत आहे.
आज आढळलेल्या बाधितांमध्ये सर्वाधिक आकडा हा पाथर्डी तालुक्याचा असून हा आकडा 213 असून त्या खालोखाल अकोले 205 व नगर ग्रामीण 202 असा क्रमांक लागतो. तर श्रीरामपूर, श्रीगोंदा, कर्जत, जामखेड हे तालुके वगळता उर्वरित तालुके शंभरच्या पुढे आहेत. अनेक दिवसाच्या प्रतिक्षेनंतर आज प्रथमच सर्व तालुक्याची आकडेवारी 300 च्या आत आहेत.
अशीच आकडेवारी कमी होत राहीली तर संपूर्ण जिल्हा लवकरच कोरोनामुक्त होईल, अशी आशा व्यक्त केली जात आहे. त्यातच आता विनाकारण फिरणार्यांची जागेवरच अँटीजेन चाचणी करण्याच्या निर्णयामुळे घराबाहेर पडणार्यांची संख्या घटून कोरोना बाधितांची संख्या कमी होण्यास मदत होणार आहे.
आज रविवारी आढळलेल्या बाधितांमध्ये जिल्हा रुग्णांलयाच्या चाचणी अहवालात 380, खाजगी प्रयोगशाळेतील तपासणी अहवालात 863 तर अँटीजेन चाचणीत 862 असे 2105 कोरोना बाधित आढळून आले.
आज आढळून आलेली आकडेवारी पाथर्डी 213, अकोले 205, नगर ग्रामीण 202, नेवासा 175, कोपरगाव 174, राहुरी 153, संगमनेर 151, नगर शहर 129, पारनेर 129, शेवगाव 124, राहाता 100, श्रीरामपूर 94, श्रीगोंदा 78, कर्जत 68, जामखेड 52, इतर जिल्हा 33, भिंगार कँटोन्मेंट 24, मिलटरी हॉस्पिटल 01 असे कोरोना बाधित आढळले आहेत.
नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडू नये, नियमित मास्क लावा, हात स्वच्छ धुवावे व शासनाने ठरवून दिलेल्या नियमाचे पालन करावे, असे आवाहन करण्यात येत आहे.
Comments