शेवगाव, पाथर्डी । वीरभूमी- 17-May, 2021, 12:00 AM
केंद्र सरकारच्या अखत्यारित असलेल्या पेट्रोल, डिझेल, गॅस, रासायनिक खते यांच्या किंमती दिवसेंदिवस वाढत आहेत. या दरवाढीमुळे शेतकरी व सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे. या दरवाढीचा शेवगाव तालुका व पाथर्डी तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने तहसीलदारांना निवेदन देऊन केंद्र सरकारच्या धोरणाचा निषेध करत दरवाढ मागे घेण्याची मागणी केली.
देशभरात दिवसेंदिवस केंद्र सरकारच्या अखत्यारित असलेल्या पेट्रोल, डिझेल, गॅस या इंधनाबरोबरच रासायनिक खतांच्या किंमती भरमसाठ वाढल्या आहेत. याचा परिणाम म्हणुन दैनदिन वापरातील वस्तूंच्याही किंमती सर्वसामान्यांच्या अवाक्याबाहेर गेल्या आहेत. यामुळे शेतकर्यांसह सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे.
त्यातच कोरोना संसर्गामुळे हाताला काम नाही यामुळे आर्थिक चणचण भासत आहे. त्यातच पेट्रोल, डिझेल, गॅस, रासायनिक खते यांच्या किंमती वाढल्याने आर्थिक नियोजन बिघडले आहे.
या दरवाढीचा निषेध करत माजी आ. नरेंद्र घुले, माजी आ. चंद्रशेखर घुले व पंचायत समिती सभापती डॉ. क्षितीज घुले यांच्या मार्गदर्शनाखाली शेवगावच्या तहसीलदार अर्चना पागिरे यांना तालुका राष्ट्रवादीच्यावतीने निवेदन देण्यात आले.
यावेळी ज्येष्ठ नेते तथा ज्ञानेश्वरचे संचालक काकासाहेब नरवडे, युवक राष्ट्रवादीचे जिल्हा कार्याध्यक्ष संजय कोळगे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष कल्याण नेमाने, भागवत गुरूजी, युवक राष्ट्रवादीचे कमलेश लांडगे, ताहेर पटेल, अशोकराव पातकळ, नंदकिशोर मुंढे, समीर शेख, कृष्णा सातपुते, संतोष जाधव, संतोष पावशे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
पाथर्डी येथे नायब तहसीलदार पंकज नेवसे यांना निवेदन देण्यात आले. यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य शिवशंकर राजळे, राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष सिताराम बोरुडे, युवक राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष चंद्रकांत मरकड, शहराध्यक्ष योगेश रासणे, दिगंबर गाडे, देवा पवार, शुभम वाघमारे विनय बोरुडे, सतिष शेळके आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
केंद्र सरकारने केलेली दरवाढ तातडीने मागे घ्यावी, अन्यथा राष्ट्रवादीच्यावतीने तीव्र स्वरुपाचे आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.
Comments