कुकडी कारखान्याच्या इतिहासात प्रथमच निवडणूक बिनविरोध
माजी आमदार राहुल जगताप यांचे प्राबल्य अधोरेखित
श्रीगोंदा । वीरभूमी- 03-Jan, 2022, 09:46 PM
श्रीगोंदा तालुक्यातील अग्रगण्य सहकारी साखर कारखाना असलेला कर्मयोगी कुंडलिकराव रामराव जगताप पाटील कुकडी सहकारी साखर कारखाना निवडणुकीत अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी दि. 3 रोजी तालुक्याचे माजी आमदार, जिल्हा बँकेचे संचालक व विद्यमान चेअरमन राहुल जगताप यांच्या चाणक्य नीती व कौशल्यपूर्ण संयमाने सर्व जागा बिनविरोध केल्या आहेत. स्व. कुंडलीकराव जगताप यांच्या निधनानंतर त्यांच्या अनुपस्थित होणार्या पहिल्याच निवडणुकीत कारखान्याचे चेअरमन राहुल जगताप यांनी आपले एकहाती प्राबल्य पुन्हा अधोरेखित केले आहे. या निवडीमुळे राहुल जगताप यांच्यावर तालुक्यातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.कारखान्यासाठी 16 जानेवारी रोजी मतदान होणार होते. मात्र सोमवारी अर्ज माघार घेण्याची मुदत 3 वाजेपर्यंत होती. मात्र विरोधी गटाच्या प्रमुख उमेदवारांचे सलग तीनवेळा ऊस कारखान्याला न आल्यामुळे उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी दिग्विजय आहेर यांनी अपात्र केले.
या अपात्रतेच्या विरोधात सात उमेदवारांनी औरंगाबाद खंडपीठात आव्हान दिले. परंतु न्यायालयाने निवडणूक निर्णय अधिकार्यांचा निर्णय कायम ठेवल्याने हे उमेदवार अपात्र ठरले.
आधीच काही जागा बिनविरोध झाल्याने निवडणुकीची रंगत गेली होती. त्यातच विरोधकांचा लंगडा पॅनल होत असल्याने व राहुल जगताप यांच्या मुरब्बी राजकारणामुळे राहिलेल्या उमेदवारांनी अर्ज मागे घेतले. सत्ताधारी गटाने ठरविलेल्या उमेदवारांचे आव्हानच संपुष्टात आल्याने निवडणूक निर्णय अधिकारी दिग्विजय आहेर यांनी सर्वच्या सर्व 21 जागा बिनविरोध निवडुन आल्याचे जाहीर केले.
बिनविरोध निवडून आलेल्या मध्ये माजी आ. राहुल जगताप, त्यांच्या पत्नी प्रनोती जगताप, निवृत्ती वाखारे, विजय शिर्के, सुभाष राक्षे, विवेक पवार, संभाजी देविकर, अशोक वाखारे, मोहन आढाव, मनोहर शिंदे, कचरू मोरे, प्रमोद इथापे, मच्छिंद्र नलगे, जालिंदर निंभोरे, अशोक शितोळे, बाळासाहेब उगले, आबासाहेब शिंदे, अनिता लगड, विमल मांडगे, मोहन कुदांडे, संपत कोळपे हे सर्व उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत.
कुकडी कारखाना निवडणूक ही स्व. कुंडलिकराव जगताप यांच्या निधनानंतर पहिलीच निवडणूक होती. या निवडणुकीत माजी आ. राहुल जगताप यांच्यावर सभासद आणि विरोधक यांनी मनाचा मोठेपणा दाखवत विश्वास व्यक्त करीत कुंडलिक तात्यांप्रती सभासदांनी कृतज्ञता व्यक्त केली आहे. तर तरुण तडफदार नेते माजी आमदार राहुल जगताप यांचा तालुक्यातील राजकारणात जबाबदार नेते म्हणून उदय झाला आहे.
निवडीनंतर माजी आ. राहुलदादा जगताप म्हणाले, इतिहासात पहिल्यांदाच कुकडी कारखान्याची निवडणूक बिनविरोध झाली आहे. त्याबद्दल आमदार बबनराव पाचपुते, घनश्याम अण्णा शेलार, राजेंद्र नागवडे, बाबासाहेब भोस, भगवानराव पाचपुते, दिनकर पंधरकर, दत्ता पानसरे, पवार वकील, लक्ष्मण नलगे या सर्व ज्येष्ठांनी एकत्र येत माझ्यासारख्या एका तरुण उमद्या सहकार्याला तात्यांच्या पाठीमागे आशीर्वाद देण्याचे काम केले.
घनश्याम आण्णा यांनी माझ्यावरचा ताण खुप हलका केला. सर्व इच्छुक उमेदवारांची मनधरणी करण्यासाठी मोलाची मदत केली. तोलामोलाचे इच्छुक उमेदवार असतानाही काही जणांना थांबावे लागले त्यांनीही मनाचा मोठेपणा दाखवला. त्यामुळे मी त्यांचा शतशः आभारी आहे. जो विश्वास आमच्यावर टाकला आहे, त्या विश्वासाला पात्र राहून कारखाना व शेतकर्यांचा नावलौकिक वाढविण्यासाठी कटिबद्ध असल्याचे सांगितले.
कुकडी कारखाना निवडणुकीसाठी एकूण 141 अर्ज आले होते. त्यापैकी 31 अर्ज अवैध झाले तर राहिलेल्या 110 अर्जांपैकी 89 उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्याने एकूण राहिलेले 21 उमेदवारी अर्ज बिनविरोध म्हणून जाहीर केले आहेत. 7 उमेदवारांनी अपात्रतेच्या विरोधात खंडपीठाचे दरवाजे ठोठावले. मात्र न्यायालयाने निवडणूक निर्णय अधिकार्यांचा निर्णय कायम ठेवला. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून जिल्हा निबंधक दिग्विजय आहेर तर सहाय्यक म्हणून सहाय्यक निबंधक अभिमान थोरात यांनी काम पाहिले.
Comments