पैसे परत मागितले म्हणुन दिली जीवे मारण्याची धमकी । दोघांजणांवर गुन्हा दाखल
अकोले । वीरभूमी- 20-Jun, 2021, 12:00 AM
माझी मंत्रालयात व मंत्र्याशी मोठ्या प्रमाणात ओळख आहे. तुला महसूल विभागातील आरक्षीत कोट्यातुन नोकरी लावून देतो. त्यासाठी पैसे द्यावे लागतील. पैसे दे तुला तलाठी पदावर नोकरी लावण्याची जबाबदारी माझी, असा विश्वास दाखवून तब्बल 18 लाख 47 हजार 700 रुपयांची फसवणूक करुन, पैसे परत मागितले असता शिवीगाळ करुन जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी नितीन गंगाधर जोंधळे (रा. कोकणगाव, ता. संगमनेर) व विजयकुमार श्रीपती पाटील (रा. ललित बिल्डिंग, नांदेड सिटी, सिंहगड रोड, पुणे) या दोघांविरोधात अकोले पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अकोले पोलिस ठाण्यात शेखर नंदू वाघमारे (वय 30, रा. अकोले पोलीस स्टेशनच्या मागे, अकोले) यांनी फिर्याद दिली असुन यात म्हटले आहे की, माझे नातेवाईकांच्या मित्राचे ओळखीने ओळख झालेले नितीन गंगाधर जोंधळे व विजयकुमार श्रीपती पाटील यांनी मला वेळोवेळी माझी मंत्रालयात व मंत्र्याशी मोठ्या प्रमाणात ओळख आहे. मी अनेकांना शासकीय नोकरीला लावलेले आहे. तुम्ही पैसे द्या, तुम्हालाही महसूल विभागाच्या आरक्षीत कोठ्यातुन नोकरीला लावून देतो.
पैसे दिले तर तुम्हाला तलाठी पदावर नियुक्ती करुन देतो. असे वारंवार सांगत असल्याने यावेळी नितीन जोंधळे यांनी पैशाची हमी घेतली व विजयकुमार श्रीपती पाटील यांनी अनेकांना नोकरीला लावल्याच्या आर्डर्स दाखवल्याने विश्वास प्राप्त झाल्याने फिर्यादी वाघमारे यांनी दि.03/07/2020 रोजी ते दि. 15/03/2021 रोजी पर्यंत नितीन गंगाधर जोंधळे व विजयकुमार श्रीपती पाटील यांना तलाठी पदासाठी नोकरी लावण्यासाठी 14 लाख 45 हजार रुपये रोख व ऑनलाइन रक्कम 04 लाख 02 हजार 700 रुपये असे एकूण रक्कम 18 लाख 47 हजार 700 रुपये घेऊन फिर्यादीस दिले.
मात्र पैसे देवुनही कोणत्याही प्रकारचे तलाठी पदाचे अपॉइंटमेंट लेटर, अर्थात नियुक्ती पत्र न मिळाल्याने दोघांनी फिर्यादीची रक्कम 18 लाख 47 हजार 700 रुपयांची फसवणूक केल्याने फिर्यादी नितीन गंगाधर जोंधळे यांचेकडे सदर दिलेल्या पैशाची पुन्हा मागणी करण्यासाठी गेले असता त्याचा राग येऊन जोंधळे यांनी फिर्यादीस शिवीगाळ करून जीवे ठार मारण्याची धमकी दिली.
याप्रकरणी अकोले पोलिस ठाण्यात गुन्हा रजि. नंबर 212/2021 भादंवि कलम 420, 323, 504, 506 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास प्रभारी पोलिस निरीक्षक मिथुन घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली पो.स.ई.साबळे करत आहेत.
fIMmvXhQYrtsGiJn