विजय उंडे । वीरभूमी- 18-Feb, 2023, 08:30 AM
श्रीगोंदा ः श्रीगोंदा-शिरूर तालुक्याला समृद्धीकडे नेऊन लोकांचे जीवनमान उंचावणार्या घोड धरणाच्या डावा कालवा व चार्यांची आज वयपरोत्वे बिकट अवस्था झाल्याने कालव्यावरील पुल व वितरिकांची दुरावस्था झाली आहे. मढेवडगाव ते श्रीगोंदा फॅक्टरी दरम्यान असलेल्या जुन्या वांगदरी वाटेवरील ओढ्यावरील कालव्याच्या पुलाच्या मोर्यांच्या भिंती ढासळत असून घोड व कुकडी पाटबंधारे विभागाचे अक्षम्य दुर्लक्ष झाल्याने शेतकर्यांच्या शेतजमिनीला मोठा धोका निर्माण झाला आहे.
भारत स्वतंत्र झाल्यानंतर 1953 साली धरणाची मुहूर्तमेड रोवून 1965 पर्यंत काम चालले. धरणाचे पाहिले आवर्तन 1968 साली झाले. 7.5 टीएमसी पाणी साठवण क्षमता असलेल्या धरणात दोन टीएमसी मृतसाठा आहे. उपयुक्त 5.5 टीएमसी पाणीसाठा वापरण्यायोग्य आहे.
श्रीगोंदा तालुक्यातील 36 गावे व कर्जत तालुक्यातील 19 गावे बागाईत झाली. अनेक गावांच्या पाणीपुरवठा योजना, नागवडे साखर कारखाना, घोडगंगा साखर कारखाना, श्रीगोंदा, काष्टी, बेलवंडी सारख्या मोठ्या गावांची पाणीपुरवठा योजना व रांजणगाव गणपती येथील पंचतारांकित औद्योगिक वसाहत याच धरणावर अवलंबून आहे.
काही ज्येष्ठ मंडळीकडे माहिती घेतली असता पूर्वी बाराही महिने कालव्याला पाणी असायचे. कालव्याचे मातीकाम केलेले अनेक बुजुर्ग आजही जिवंत आहेत. त्यावेळी पक्के काम केले होते. परंतू पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष झाल्याने आजही तीन वितरिका सोडता एकाही वितरिकेला दरवाजा नाही आणि कालव्यावरील अनेक पुल शेवटाची घटका मोजत आहेत.
तर मढेवडगाव ते श्रीगोंदा फॅक्टरी दरम्यान असलेल्या म्हातारपिंप्री व मढेवडगाव हद्दीतील जुन्या वांगदरी वाटेवरील पुलाच्या दगडी भिंतीचा काही भाग कोसळला आहे. तरीही पाटबंधारे विभागाच्या एकाही कर्मचारी व अधिकारी यांच्या हे गावीही नाही. दोन वर्षापूर्वी चिंभळा परिसरात कालवा फुटल्याने अनेक शेतकर्यांच्या जमिनी वाहून गेल्या होत्या. त्यात अनेक शेतकर्यांचे न भूतो न भविष्यतो नुकसान झाले होते.
पुलाची पडझड झाल्यामुळे येत्या आवर्तनात पुल कोसळला तर होणार्या नुकसानीचा प्रश्न पुलाच्या शेजारील म्हातारपिंप्री व मढेवडगावच्या शेतकर्यांना भेडसावत आहे.
म्हातारपिंप्रीच्या हद्दीतील जुन्या वांगदरी वाटेवरील ओढ्यावर असलेल्या घोड कालव्याचा पुल अनेक वर्षांपासून खिळखिळा झाला आहे. गेल्यावर्षीच्या अतीपावसामुळे या पुलाच्या भिंतीला भगदाड पडले असून आवर्तनकाळात पाणी मुरून कधीही पुल कोसळू शकतो. आवर्तनकाळात पुल कोसळला तर शेजारील अनेक शेतकर्यांच्या जमिनी वाहून जाण्याचा धोका निर्माण झाला आहे. - ऋषीकेश वाबळे, माजी सरपंच, म्हातारपिंप्री
लवकरच पुलाची दुरुस्ती करणार घोड पाटबंधारे विभागाचे उपअभियंता ठणके मारुती पांडुरंग यांच्याशी याबाबत संपर्क साधला असता ते म्हणाले की, मी नव्याने पदभार स्वीकारला आहे. मला या गोष्टीची माहितीच नाही. माहिती घेऊन सांगतो. त्यानंतर एक तासाने परत संपर्क साधला असता ते म्हणाले की, मी पुलाची पाहणी केली आहे व कुकडी पाटबंधारे कार्यालयाच्या कार्यकारी अभियंता यांना कळवले आहे. लवकरच पुलाची दुरुस्ती करण्यात येणार आहे.
LitNKArDSua