पाथर्डी । वीरभूमी- 22-Apr, 2021, 12:00 AM
ऑक्सिजन पुरवठा व रेमडेसीवीर इंजेक्शनच्या मुद्द्यावरून राज्यासह जिल्ह्यात अत्यंत बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे. यामुळे परिस्थिती हाताबाहेर गेली आहे. अशा भयंकर परिस्थितीमुळे सर्वत्र घबराट पसरली आहे, अशी परिस्थिती निर्माण होण्यास राज्य सरकार व नेतेमंडळी जबाबदार असून हे त्यांचे अपयश आहे. अशी टीका आमदार मोनिका राजळे यांनी केली.
दिपाली प्रतिष्ठान व गोकुळ दौंड मित्र मंडळाच्या वतीने पाथर्डी शहरापासून सुमारे पाच किलोमीटर अंतरावर राष्ट्रीय महामार्गावरील आगसखांड गावच्या शिवारामध्ये 300 बेडचे अद्ययावत सुविधा असलेले लोकनेते गोपीनाथ मुंडे कोविड केंद्राचे उद्घाटन करण्यात आले.
कोविड सेंटरचे उद्घाटन तारकेश्वर गडाचे महंत आदिनाथ महाराज शास्त्री, महंत संतोष भारती यांच्या हस्ते व प्रांताधिकारी देवदत्त केकान, तालुका आरोग्य अधिकारी भगवान दराडे, विष्णुपंत अकोलकर, नगराध्यक्ष डॉ. मृत्युंजय गर्जे, मुकुंद गर्जे, अमोल गर्जे, पंचायत समितीच्या सभापती सूनिता दौंड, भूषण कोंडे, भाजपचे जिल्हाध्यक्ष अरुण मुंडे, बंडू पठाडे, बाळासाहेब गोल्हार आदी सर्व कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.
या कोविड केंद्रासाठी खासदार डॉ.सुजय विखे परिवाराच्या वतीने त्यांच्या मालकीची भव्य इमारत उपलब्ध करून दिली आहे.
यावेळी बोलताना राजळे म्हणाल्या, विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस व प्रवीण दरेकर यांनी राज्यातील आरोग्यविषयक भीषण परिस्थिती पाहता राज्य शासनाला देऊ केलीली मदत नाकारली. आरोग्य सुविधा नाकारून सत्ताधार्यांनी अत्यंत खालच्या पद्धतीने राजकारण केले आहे. सरकारकडून अत्यंत वेगळ्या पद्धतीची टीका होते, अशी कार्यपद्धती म्हणजे राज्याचे सुद्धा दुर्दैव आहे.
अत्यंत आर्तपणे सर्वत्र फिरून हताशपणे एखादा गरजू हॉस्पिटलचे बेड, ऑक्सिजन किंवा इंजेक्शन मागतो पण आपण त्याला देऊ शकत नाही. याचे माणूस व आमदार म्हणून तीव्र दुःख होते.अनेक सेवाभावी संस्था सेंटरच्या माध्यमातून सेवा कार्यासाठी पुढे येत आहेत. प्रशासन व जनतेने त्यांना सहकार्य करावे.
प्रास्ताविक करताना केंद्राचे प्रमुख संयोजक गोकुळ दौंड म्हणाले की, लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या नावाने राज्यातील एकमेव कोविड केंद्र पाथर्डी तालुक्यात सर्वप्रथम सुरू करण्यात येऊन येथे दाखल होणार्या रुग्णांना जेवण, नाष्टा, चहा, पाणी, आरोग्य सुविधा, अँटीजेन तपासणी, औषधोपचार आदी सुविधा पूर्णपणे मोफत दिल्या जातील. तज्ञ डॉक्टर व स्टाफ अहोरात्र तैनात असेल. 300 पेक्षा जास्त बेडची गरज भासली तरी तशी तरतूद प्रतिष्ठाने केली आहे.
समविचारी कार्यकर्त्यांनी या कार्यात सहभागी होऊन जनतेचे दुःख हलके करून त्यांना आधार देण्यासाठी पुढे यावे. विखे परिवाराने यासाठी विशेष सहकार्य केले असे दौंड म्हणाले.
bLiwKyRArjH