शेवगाव । वीरभूमी- 20-Mar, 2021, 12:00 AM
मागील भांडणाच्या कारणावरून पाच जणांनी केलेल्या मारहाणीत ठाकुर पिंपळगाव येथील हरिभाऊ पांडुरंग बडधे (वय 42 वर्षे) याचा मृत्यू झाला. मारहाण करणार्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी मयताच्या नातेवाईकांनी मृतदेह थेट शेवगाव पोलिस ठाण्यात आणला. दुपारी 4 वाजेपासून सायंकाळी 7 वाजेपर्यंत मृतदेह पोलिस ठाण्यात आणुन ठेवण्यात आला.
यामुळे काहीकाळ वातावरण तणावग्रस्त बनले होते. यानंतर शेवगाव पोलिस ठाण्यात मारहाण करणार्या पाच जणांवर मृत्यूस कारणीभूत ठरल्याचा गुन्हा दाखल केल्यानंतर नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेतल्याने तणाव निवाळला.
याबाबत समजलेली माहिती अशी की, शेवगाव तालुक्यातील ठाकुर पिंपळगाव येथील हरिभाऊ पांडुरंग बडधे (वय 42) हा शुक्रवार दि. 19 रोजी सायंकाळी 7.30 वाजेच्या दरम्यान बोधेगाव येथे डिझेल आणण्यासाठी मोटारसायकलवर गेला होता. बोधेगाव येथून डिझेल घेऊन येतांना शिंदळीच्या ओढ्यात हरिभाऊ बडधे याला किशोर उद्धव दहफिळे, दिलीप महादेव दहिफळे, सुनील दिलीप दहिफळे, अनिल दिलीप दहिफळे, सोमनाथ सोन्याबापू दहिफळे (सर्व रा. ठाकुर पिंपळगाव) यांनी मागील भांडणाच्या कारणावरून मारहाण केली.
वरील पाच जणांनी मारहाण केल्यानंतर हरिभाऊ हा घरी आला असता लहान भाऊ नारायण पांडुरंग बडधे याला सर्व हकीगत सांगितली. यावेळी नारायण याने काही घाबरू नको, काय असेल ते आपण सकाळी पाहु, असे म्हणुन तो आपल्या कामावर निघून गेला.
शनिवारी सकाळी नारायण बडधे हा हरिभाऊ बडधे याला झोपेतून उठवण्यासाठी गेला असता तो मयत झाल्याचे लक्षात आले.
त्याला शेवगाव उपजिल्हा रुग्णालयात आणले असता तेथील डॉक्टरांनी मयत घोषित केले. त्यानंतर मयताच्या नातेवाईकांनी मारहाण करणार्या आरोपीवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यासाठी सायंकाळी 4 वाजता रुग्णालयातून मृतदेह थेट शेवगाव पोलिस ठाण्यात आणला.
पोलिस ठाण्यात मृतदेह आणल्यानंतर काहीकाळ तणाव निर्माण झाला होता. मारहाण करणार्या आरोपींवर सदोष मणुष्यवधाचा गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नसल्याची भूमिका घेतल्याने तणाव निर्माण झाला होता.
त्यानंतर सायंकाळी 7 वाजता शेवगाव पोलिस ठाण्यात मारहाण करणारे किशोर उद्धव दहफिळे, दिलीप महादेव दहिफळे, सुनील दिलीप दहिफळे, अनिल दिलीप दहिफळे, सोमनाथ सोन्याबापू दहिफळे (सर्व रा. ठाकुर पिंपळगाव) यांच्यावर नारायण पांडुरंग बडधे यांच्या फिर्यादीवरून मृत्यूस कारणीभूत ठरल्याचा गुन्हा दाखल केला. यानंतर नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेतला.
Comments