राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्या शेवगाव शाखेची मागणी
शेवगाव । वीरभूमी- 27-Dec, 2020, 12:00 AM
ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये तालुक्यातील प्राथमिक शिक्षकांना मतदान केंद्राध्यक्ष म्हणून आदेश देऊ नयेत तसेच मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांना मतदान केंद्रावर निवडणुकीचे काम देऊ नये, अशी मागणी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्या शाखेच्या वतीने करण्यात आले आहे.
प्राथमिक शिक्षक बँकेचे संचालक विनोद फलके, सदिच्छा मंडळाचे जिल्हा सरचिटणीस बाळासाहेब डमाळ, बाळकृष्ण कंठाळी, प्रकाश लबडे, प्राथमिक शिक्षक संघाचे तालुकाध्यक्ष रामकृष्ण काटे, सदिच्छा मंडळाचे तालुकाध्यक्ष पांडुरंग नागरे आदींनी ही मागणी केली आहे. याबाबतचे निवेदन उद्या सोमवारी (दि. 28) शेवगावच्या तहसीलदार अर्चना पागिरे यांना देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
तालुक्यातील 48 ग्रामपंचायत निवडणुकीसाठी गाव पातळीवर मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) म्हणून काम करणार्या प्राथमिक शिक्षकांना निवडणुकीचे आदेश मिळाले आहेत. तसेच अनेक प्राथमिक शिक्षकांना मतदान केंद्राध्यक्ष म्हणून निवडणूक शाखेकडून आदेश प्राप्त झाले आहेत.
मतदान केंद्रस्तरीय अधिकारी वर्षभरात अनेक वेळा मतदार नोंदणीचे काम करत असतात तसेच सार्वत्रिक निवडणुकांमध्ये गावपातळीवर मतदारांना मतदार चिक्की वाटपाचे काम करत असतात. त्यामुळे त्यांना निवडणुकीचे काम दिले जाऊ नये.
तसेच ग्रामपंचायत निवडणूक ही अतिशय संवेदनशील असल्याने प्राथमिक शिक्षकां ऐवजी माध्यमिक किंवा उच्च माध्यमिक शिक्षकांना मतदान केंद्राध्यक्ष जबाबदारी द्यावी, प्राथमिक शिक्षकांना मतदान केंद्रात केंद्रस्तरीय अधिकारी म्हणून आदेश द्यावेत. अशी मागणी संघटनेने केली आहे. अशी मागणी प्राथमिक शिक्षक संघाने केली आहे. तालुक्यातील विविध संघटना व प्राथमिक शिक्षक उपस्थित राहणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
pvCLDOZENUgtqdJf