12 लाख रुपयांचा मुद्देमालाची चोरी
श्रीगोंदा ग्रामीण । वीरभूमी - 16-Apr, 2021, 12:00 AM
लिंबू उत्पादनात अग्रेसर असलेल्या श्रीगोंदा तालुक्यातील शेतकरी आता चोरट्यांच्या धास्तीने हैराण झाले आहेत. शहरालगत असलेल्या औटीवाडी येथील शेतकर्यांच्या सात एकर लिंबू बागेतून सुमारे 12 लाख रुपयांचे लिंबू चोरीला गेल्याची घटना घडली आहे.
या चोरीच्या घटनांमुळे शेतकरी हैराण झाले असून अशा चोर्या थोपवणे व चोरट्यांना पकडण्याचे आव्हान पोलिसांसमोर उभे राहिले आहे.
सध्या उन्हाळ्याच्या काहिलीमूळे देशभरातून लिंबाला मोठी मागणी आहे. देशात लिंबू उत्पादनात श्रीगोंदा तालुका अग्रगण्य मानला जातो. उन्हाळ्यात लिंबू उत्पादनात पाण्याअभावी व इतर नैसर्गिक कारणाने नेहमी घट होते. याचाच परिणाम म्हणून याकाळात लिंबाचे भाव गगनाला भिडतात.
गेल्या काही दिवसांपासून लिंबाचा बाजार सत्तर रुपये किलो पासून शंभर रुपये किलोवर गेला आहे. या नगदी पिकावर चोरांचा डोळा पडला तर नवल नाही. सध्या संचारबंदी लागू आहे. औटेवाडी भागात शेतीसाठी दिवसाची वीज असते. त्यामुळे शेतकरी रात्री शेतावर जात नाहीत.
याच गोष्टीचा फायदा घेत चोरट्यांनी औटी बंधूंच्या सात एकर क्षेत्रावर असलेल्या लिंबू बागेतील लिंबे वीस ते पंचवीस अज्ञात चोरट्यांनी रात्रीच्या सुमाराला एकाचवेळी काठीने लिंबे झोडून चोरी करून नेले.
अंदाजे दहा ते बारा लाख रुपयांची चोरी झाली असल्याचे शेतकरी माजी नगरसेवक दादासाहेब औटी यांनी सांगितले.
शहरातील औटीवाडी तलावालगत नगरसेवक दादासाहेब औटी त्यांचे बंधू प्रदीप औटी आणि अरुण औटी या तिघांच्या मिळून लिंबू बागेतील लिंबू अज्ञात 20-25 चोरट्यांनी काठ्यांच्या साहाय्याने झोडून लिंबे चोरून नेली आहेत. हा सर्व प्रकार सकाळी शेतात गेल्यावर औटी बंधूंच्या लक्षात आला.
औटी यांनी श्रीगोंदा पोलीस ठाण्यात येऊन याबाबत फिर्याद देणार असल्याचे सांगितले.
तसेच तालुक्यातील लिंबू व्यापार्यांकडे जर हिरवी-कच्ची लिंबे जास्त प्रमाणात विक्रीसाठी आली तर श्रीगोंदा पोलीस ठाण्यात माहिती द्यावी, असे माजी नगरसेवक दादासाहेब औटी यांनी व्यापार्यांना आवाहन केले.
NjFxvGmTqfdz