शेवगाव । वीरभूमी- 14-Apr, 2021, 12:00 AM
कोरोनाच्या दुसर्या लाटेत संसर्गाचा वाढता प्रादुर्भाव विचारात घेऊन तालुका प्रशासन विविध उपाययोजना करत आहे. मात्र निधी अभावी तालुक्यातील गंभीर स्वरूपाच्या आजारी व्यक्तींना ऑक्सिजन, व्हेंटिलेटर, आयसोलेशन आदी सुविधा अपुर्या पडत आहेत. यामुळे काही रुग्णांना जिल्हा रुग्णांलयात उपचारासाठी पाठविले जाते.
या सुविधा शेवगाव येथेच मिळाव्यात म्हणुन दानशूर व्यक्तींनी मदत करावी असे आवाहन प्रशासनाने केले होते. या आवाहनानंतर शेवगाव तालुक्यातील कोव्हिड केअर सेंटरसाठी दानशूर व्यक्तींनी मदतीचाचा हात पुढे केला आहे. बुधवारी तालुक्यातील सात दानशूर व्यक्तींनी सुमारे 67 हजार रूपयांची मदत केली.
यामध्ये ठेकेदार राहुल देशमुख यांनी आपल्या मुलीच्या वाढदिवसाच्या निमित्ताने खर्च टाळून 21 हजार रुपये दिले. गटविकास अधिकारी महेश डोके व तालुका वैद्यकिय अधिकारी डॉ. सलमा हिराणी यांच्याकडे ही मदत सुपूर्द केली.
करोनाच्या दुसर्या लाटेत राज्यात कोरोना पॉझिटिव्ह रूग्णांची संख्या तसेच मृत्यूची संख्याही वाढू लागली आहे. शेवगाव तालुक्यातही रूग्णसंख्येत दिवसेंदिवस भर पडत असल्याचे चित्र आहे. तर जिल्ह्यातील रुग्णालयात बेड मिळत नाही. रेमडिसिव्हर इंजेक्शनसाठी धावपळ करावी लागत असल्याचे पाहावयास मिळते.
या पार्श्वभुमीवर शेवगाव तालुक्यातील रुग्णांना तालुक्यातच सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी तहसिलदार अर्चना पागिरे यांच्या मार्गदर्शनाखाली गटविकास अधिकारी महेश डोके यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर शासकिय वसतिगृहातील कोव्हिड केअर सेंटर अद्यावत करण्यासाठी व तालुक्यातील रुग्ण उत्तम सुविधा देण्याचे नियोजन आरोग्य विभागाशी चर्चा करून केले.
मात्र तेथे अद्यावत सुविधा देण्यासाठी निधीची गरज असल्याचे लक्षात आले. या परिस्थितीचे गांभीर्य त्यांनी शहरातील काही उद्योजकांच्या लक्षात आणून दिले. त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत ठेकेदार राहुल देशमुख यांनी आपल्या मुलीच्या वाढदिवसाच्या निमित्ताने खर्च टाळून 21 हजार रुपये दिले.
तर व्यंकटेश उद्योग समूहाचे अनिल गुंजाळ यांनी 11 हजार रूपये तर माध्यमिक सोसायटीचे माजी चेअरमन सुनील काकडे यांनी 10 हजार रूपये तर कुलदीप शशिकांत फडके यांनी 10 हजार रूपये, सचिन लांडे यांनी 5 हजार रूपये, अतुल लांडे यांनी 5 हजार रूपये तसेच प्रवीण भारस्कार यांनी 5 हजार रुपये अशी मदत आज गटविकास अधिकारी महेश डोके व तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सलमा हिराणी यांचेकडे सुपूर्द केली.
शेवगाव तालुक्यातील कोव्हिड केअर सेंटरसाठी नोडल ऑफिसर म्हणून शिक्षण विस्तार अधिकारी शैलजा राऊळ या काम पाहत आहे.
या पुढे देखील कुणाला वस्तू स्वरूप अथवा रोख स्वरूपात मदत करावयाची असल्यास त्यांनी गटविकास अधिकारी महेश डोके किंवा नोडल ऑफिसर तथा शिक्षण विस्तार अधिकारी शैलजा राऊळ यांचेकडे संपर्क करावा, असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.
snUWiMGukpO