आ. मोनिकाताई राजळे यांनी घेतली गृहमंत्री अनिल देशमुख यांची भेट
पाथर्डी । वीरभूमी - 05-Mar, 2021, 12:00 AM
पाथर्डी व शेवगाव पोलिस ठाण्यांना नवीन इमारती बांधाव्यात, खरवंडी कासार व बोधेगाव येथे स्वतंत्र पोलिस ठाणे करावे व पोलिस कर्मचार्यांसाठी वसाहत बांधण्याच्या मागणीसाठी आमदार मोनिकाताई राजळे यांनी आज राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांची भेट घेत निवेदन दिले.
या मागणीमुळे शेवगाव-पाथर्डी तालुक्यातील कायदा व सुव्यवस्था आबाधित राखण्यास मदत होणार असल्याने पोलिस प्रशासन अधिक गतीमान होण्यास मदत होणार असल्याने नागरिकांमधून समाधान व्यक्त होत आहे.
पाथर्डी व शेवगाव येथील पोलिस ठाणयाच्या इमारती जुन्या व जीर्ण झाल्या असून अपुर्या पडत आहेत. यामुळे दोन्ही पोलिस ठाण्यांचे काही कामकाज तहसीलच्या जुन्या इमारतीमधून चालते. तहसीलच्या इमारती जुन्या व धोकादायक झाल्याने तहसील कार्यालयाला नवीन इमारती मिळाल्या. मात्र त्याच जुन्या इमारतीतून जीव धोक्यात घालून पाथर्डी व शेवगाव तालुका पोलिस ठाण्यांचा कारभार सुरू आहे.
तसेच पोलिस वसाहतींचीही दुरावस्था झाली असून सुविधांचा अभाव पहायला मिळते. पावसाळ्या दिवसात येथे राहणार्या पोलिस कर्मचार्यांचे हाल होतात. यासाठी पोलिस वसाहतीची इमारतही नवीन होण्याची गरज आहे. त्याचप्रमाणे मराठवाड्याच्या हद्दीतून शेवगाव - पाथर्डी तालुक्यात गुन्हेगारांचा मोठ्या प्रमाणात वावर होतो. हा वावर थोपवण्यासाठी व मराठवाड्यातून होणारी गुन्हेगारी रोखण्यासाठी पाथर्डी तालुक्यातील खरवंडी कासार व शेवगाव तालुक्यातील बोधेगाव येथे स्वतंत्र पोलिस ठाणे होणे गरजेचे आहे.
या मागण्यानसाठी शेवगाव-पाथर्डीच्या आमदार मोनिकाताई राजळे यांनी आज राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांची भेट घेत दोन्ही पोलिस ठाण्याच्या व वसाहतीच्या इमारती नव्याने होण्याची मागणी करत खरवंडी कासार व बोधेगाव येथे स्वतंत्र पोलिस ठाण्याची मागणी निवेदनाद्वारे केली आहे.
यावर गृहमंत्री अनिल देशमुख यांनीही सकारात्मकता दर्शवली असून दोन्ही तालुका पोलिस ठाण्यांना नव्याने इमारती मंजुरीही प्रतिक्षा लागून राहीली आहे.
Comments